वाशीम,
Washim New Farmers' Building शासनाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजने अंतर्गत वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन कोटी रूपयाचे नवीन, अत्याधुनिक शेतकरी भवन होणार आहे. नवीन शेतकरी भवनाला मंजूरी व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशीम मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांनी सहकार, पणन व वस्त्रौद्योग मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन तशी मागणी केली होती.
आ. खोडे यांच्या मागणीची दखल घेत सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागाने १३ ऑटोबर रोजी काढलेल्या शासन निर्णया अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती,वाशीम येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजने अंतर्गत वाशीम बाजार समितीमध्ये होणार्या नवीन शेतकरी भवनाचे अंदाजपत्रक दोन कोटी सात लाख सव्वीस हजार सातशे पंच्याऐंशी रूपये एवढे असून, या कामाची शासनाने १३ ऑटोबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या नवीन शेतकरी भवनामध्ये शेतक-यांना मुक्कामाची सोय होणार असून, शेतकर्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पण याच भवनामध्ये उपलब्ध होणार आहेत.
वाशीम बाजार समितीमध्ये दररोज वाशीम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. या नवीन शेतकरी भवनामुळे वाशीम व परिसरातील शेतकयांना निवासासह भोजनाची पण सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारानेच वाशीम बाजार समितीच्या नवीन शेतकरी भवनाला प्रशासकीय मान्यतेसह दोन कोटी सात लाखाचा निधी मिळाल्याबद्दल वाशीम बाजार समितीचे संचालक मंडळ व शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.