जिल्हा परिषद आरक्षण सोडतीनंतर चढला राजकीय रंग

दोन माजी सभापतींची पंचाईत, नवे नेतृत्व उदयास येण्याची चिन्ह

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Washim Zilla Parishad Reservation स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १३ ऑटोबर रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत. जाहीर झालेल्या सोडतीत कारंजा तालुयातील ८ जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यात सामाजिक न्याय आणि महिलांना समान प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने तीन गट महिला राखीव म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित गट सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार धनज बुद्रुक नामाप्र महिला, भामदेवी अनुसूचित जाती महिला, मनभा नामाप्र, उंबर्डा बाजार सर्वसाधारण, कामरगाव सर्वसाधारण, काजळेश्वर नामाप्र महिला, पोहा नामाप्र आणि धामणी गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.या आरक्षणामुळे भामदेवी गट अनुसूचित जाती महिला साठी राखीव असल्याने माजी महिला व बालकल्याण सभापती वैशालीताई लळे आणि काजळेश्वर नामाप्र महिला साठी राखीव असल्याने माजी समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे यांची पंचाईत झाल्याने त्यांना निवडणूक लढविण्यासाठी दुसर्‍या गटाचा शोध घ्यावा लागणार आहे.
 
 

Washim Zilla Parishad Reservation 
 
आरक्षणाचे पडदे उघडताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी महिला आरक्षणामुळे जुने पुरुष नेत्यांना राजकीय विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे चित्र तर काही ठिकाणी पक्षांतर्गत नवीन महिला चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. बहुतेक गटांमध्ये पक्षाकडून महिला नेते शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, राजकीय घराण्यातील महिलाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. याआरक्षण प्रक्रियेतून महिलांना मिळालेला मोठा वाटा पाहता, स्थानिक पातळीवर हा निर्णय स्वागतार्ह ठरत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करत, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत व्यक्त केले.तर काही राजकीय निरीक्षकांच्या मते, आरक्षणामुळे स्थानिक समीकरणांमध्ये मोठा बदल होईल; काही ठिकाणी नवे नेतृत्व निर्माण होईल तर काही ठिकाणी गटबाजी वाढू शकते असेही त्यांनी सांगितले.