निर्माणाधीन पुलाचे काम रखडले

*शेतकर्‍यांची फरपट, आ. वानखेडे यांना साकडे

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
कारंजा (घा.), 
work-on-under-construction-bridge : तालुक्यातील कार नदी प्रकल्प रस्त्यावरील खैरी ते सेलगाव (ल.) मार्गावरील नदीवर सुरू असलेल्या पुलाचे काम जवळपास सात महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाने नागरिकांचे दळणवळण बंद झाल्याने नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. या पुलाचे तातडीने काम पूर्ण करावे, अशा मागणीचे निवेदन आ. सुमित वानखेडे यांना देण्यात आले आहे.
 
 
jk
 
 
 
सेलगाव लवणे ते खैरी धरण या रस्त्यावरील नदीवर जवळपास २ कोटी रुपये खर्चून पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. या पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या रहादारीकारिता तात्पुरता तयार केलेला बायपास रस्ता पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला. या नदीला येणार्‍या पुरामुळे सेलगाव, खैरी धरण, बिहाडी, मदनी, परसोडी, काकडा येथील नागरिकांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे या पुलाचे काम सुरू करण्यात आले. नदीच्या दोन्ही बाजूला परिसरातील शेतकर्‍यांची शेती आहे. नदीचे पात्र मोठे असल्याने पाण्यातून नागरिकांना येणे जाणे करणे शय नव्हते.
 
 
पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने नागरिकांना जवळपास १५ ते २० किमीचा फेरा मारून शेतात जावे लागते. पुलाचे काम अर्धवट असल्याने संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शयता आहे. अपूर्ण पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, यासाठी शेतकर्‍यांनी आ. वानखेडे यांची भेट घेऊन निवेदन देत या पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी रेटून धरली आहे.
 
 
यावेळी प्रदीप शेटे, हनुमंत पठाडे, रोशन मानमोडे, प्रमोद हिंगवे, रवी पठाडे, प्रदीप फरकाडे, मारोती हिंगवे, किसना ढोले, विलास भांगे, भोजराज उघडे, मिलिंद चौधरी आदींची उपस्थिती होती.