तभा वृत्तसेवा
पुसद,
ganesh-shete : अकराशे वर्षांपासून भारतीय संस्कृतीवर आक्रमण झाले तरी आमच्या देशाला आणि संस्कृतीला कोणी संपवू शकले नाही, आपल्या पूर्वजांनी पिढ्या दर पिढ्या आपल्या संस्कृतीचा वारसा चालवत आपली संस्कृती जोपासली आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे कारण ते देशाला जोडून ठेवते, असे प्रतिपादन संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे यांनी केले.
1925 साली विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेला संघ या वर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. या निमित्ताने संपूर्ण विश्वात हे शताब्दी वर्ष उत्साहाने साजरे होत आहे. त्याप्रमाणे पुसद खंडाच्या भोजला मंडळात विजयादशमी उत्सव आणि शस्त्र पूजन उत्साहात साजरे झाले. भोजला येथील शिवाजी विद्यालयातून पथसंचलन सुरू झाले. घोषाचे विशेष आकर्षण होते. पथसंचलन मार्गात अनेक माता, भगिनी, नागरिक आणि विविध संघटनांनी रांगोळ्या काधून व पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले.
भोजला येथे विजयादशमी उत्सव रविवार, 12 ऑक्टोबर रोजी पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भोजला येथील विठ्ठल पतिंगराव तर प्रमुख वक्ते प्रांत प्रचारक गणेश शेटे, पुसद खंड संघचालक संजोग रोकडे आणि मंडळ कार्यवाह कुणाल चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गणेश शेटे पुढे म्हणाले, हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. तो परंपरांना घेऊन चालतो. गडचिरोलीत भजनी मंडळी मुलांच्या मनात संस्कार करून घेण्याचे काम भजनांचा आधार घेऊन करत आहेत. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीला भारतीय संस्कृतीमध्ये असाधारण महत्त्व आहे. आपला देश योग्य त्या ठिकाणी सैन्यशक्ती दाखवते हे जगाने पाहिले आहे. आपला देश कधी कोणावर आक्रमण करत नाही पण कोणता तसा प्रयत्न झाला तर त्याला काय उत्तर मिळाले ते ऑपरेशन सिंदूरमधून आपण पाहिले आहे.
संघ समाजामध्ये पंच परिवर्तनाचे पाच विषय घेऊन समाज प्रबोधन करत आहे, त्यामध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी जागरण-स्वचा बोध-स्वदेशी भाव, नागरिक शिष्टाचार आणि पर्यावरण-प्लॅस्टिक, पाणी, पर्यावरण या विषयांना घेऊन भेदभावविरहित समाज तयार करणे संघ करत आहे, असे प्रतिपादन गणेश शेटे यांनी केले. प्रमुख पाहुणे विठ्ठल पतींगराव यांनी युवकांना चारित्र्य, शिस्त आणि समाजहिताचे संस्कार जोपासण्याचे आवाहन केले. सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत झाले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, सज्जनशक्ती, मातृशक्ती आणि स्वयंसेवक उत्सवाला उपस्थित होते.