मुंबई :
devendra fadnavis राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली. याद्यांमधील डुप्लिकेट आणि चुकीच्या नोंदींमुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतदार याद्यांतील गोंधळ स्पष्ट करणारी उदाहरणं सुद्धा देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत," असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली. "इतके मोठमोठे नेते, आणि त्यांनाच कायद्यानुसार कुठे जायचं हे माहीत नाही? मला वाटतं त्यांना माहीत आहे, पण निवडणुकीत पराभव झाल्यास आधीच त्याचं पर्सेप्शन तयार करण्यासाठी हे नाटक सुरू आहे," असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस यांनी यावेळी निवडणूक प्रक्रियेतील यंत्रणांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. "विरोधक निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे गेले, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळं आयोग आहे. त्या आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे आहेत. काल चुकून चोकलिंगम यांच्याकडे गेले, आणि आज वाघमारे यांच्याकडे गेले. त्यांना काय मागायचंय, हेच कळत नव्हतं. हे सगळं एक फियास्को आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.मतदार याद्यांमध्ये असलेल्या त्रुटींवर सरकारकडून सहकार्याची भूमिका असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. "मतदार याद्यांमध्ये सुधारणा हवी असेल तर आमचाही पूर्ण पाठिंबा आहे. आम्हीही हेच म्हणतो की निवडणुका पारदर्शक आणि योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत," असं ते म्हणाले. मात्र, त्यांनी विरोधकांवर आरोप करताना सांगितलं की, "हे काही करायचं नाही, फक्त नॅरेटिव्ह तयार करायचं काम विरोधक करत आहेत."
मतदार याद्यांमधील गोंधळ हे नवीन प्रकरण नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली समस्या आहे, असं सांगत फडणवीस म्हणाले, "२० वर्षांपासून डुप्लिकेट नावं आहेत. तुम्ही सत्तेत असताना ती होतीच. त्यावर तुम्ही काही केलं नाहीत. आता त्याच गोष्टींचा मुद्दा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे."शेवटी फडणवीस यांनी विरोधकांना सल्ला दिला की, "पराभव स्वीकारा, जनतेसमोर जा आणि निवडणुकीला सामोरे जा. पण संविधान, नियम आणि संस्थांवर विश्वास न ठेवता केवळ आरोप आणि संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे."
राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच निवडणूक आयोग पुढे काय निर्णय घेणार, याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आगामी निवडणुकांच्या रंगतदार राजकारणाची नांदी ठरत आहे.