सुकळीच्या महिला पोलिस ठाण्यावर दारू कायमची बंद करण्याची मागणी

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
alcohol-prohibition-case : तालुक्यातील सुकळी येथे गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन, काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी संतप्त महिलांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली.
 
 
y14Oct-Sukali
 
यावेळी सुकळी ग्रामपंचायत सरपंच नेहा गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वात आर्णीचे पोलिस ठाणेदार निलेश सुरटकर यांना कायमच्या दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले. आर्णी पोलिसांच्या हद्दीतील सुकळी येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे. या धंद्याला गावात ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिला व लहान मुलांना त्रास होत आहे. तसेच विद्यार्थी व तरुणाईदेखील दारूच्या व्यसनाला बळी पडत आहेत.
 
 
या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील महिला पोलिस ठाण्यात आल्या. ‘आमच्या येथील दारूविक्री कायमची बंद करा’ अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे गावामधील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांच्या संसाराचे आर्थिक गणित विस्कळित होउन महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.
 
 
अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करून त्याची पाळेमुळे शोधून संबंधितांना कडक शासन करून कारवाई व्हावी. देशी दारू आर्णी व लोणबेहळवरून आणून गावात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. यावेळी सरपंच नेहा राठोड, सविता सुभाष राठोड, ललिता रामराव जाधव, निमा कार्तिक राठोड, पूनम जितेंद्र जाधव, सुशीला राठोड, अनिता चव्हाण, उषा तुकाराम जाधव, पंचफुला गुडे, बत्ता राजू राठोड, गीता दीपक राठोड आदी उपस्थित होते.