येथील Babaji date mahila sahakari bank बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना नोव्हेंबर २०२२ रोजी रद्द झाल्यानंतर आज दोन वर्षांनीसुद्धा ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे परत मिळाले नाहीत. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा उपनिबंधक यांची अवसायक म्हणून नियुक्ती झाली असली तरीही, अवसायकांनी नियमबाह्य पद्धतीने आयसीजीसीला तब्बल २९४ कोटी रुपये अदा केल्याचा गंभीर आरोप ठेवीदारांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई न मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी दिला.
यवतमाळात बुधवार, १५ ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलताना आ. मांगुळकर पुढे म्हणाले, अजूनही ठेवीदारांचे १७३ कोटी रुपये प्रलंबित आहेत. अवसायकांकडे सुमारे ३० कोटींची रक्कम शिल्लक असतानाही ठेवीदारांना काही प्रमाणातही पैसे देण्यात टाळाटाळ सुरू आहे. बँकेकडे ३०० कोटी रुपयांच्या कर्जदारांची मालमत्ता असूनसुद्धा विक्री करून ठेवीदारांना पैसे परत देण्यात येत नाहीत. ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, ही मालमत्ता विकली गेली, तर सर्व ठेवीदारांचे पैसे परत करता येतील आणि त्यानंतरही २०० कोटींहून अधिक रक्कम उरते.
जिल्हा उपनिबंधक आणि अवसायक यांच्या चुकीच्या नियोजनामुळे व गलथान कारभारामुळे ठेवीदारांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक हानी झाली आहे, असे आ. बाळासाहेब आणि संतोष बोरले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. येत्या पंधरा दिवसांत ठेवीदारांचे पैसे परत मिळाले नाहीत, तर आम्ही ठेवीदारांसह मंत्रालयासमोर उपोषणाला बसू आणि न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या Babaji date mahila sahakari bank बँक घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य ठेवीदारांकडून जात आहे. कर्जदारांची मालमत्ता तातडीने निविदा काढून विक्री करण्यात यावी. ठेवीदारांना त्यांच्या १७३ कोटी रुपयांच्या ठेवी तत्काळ परत करण्यात याव्यात. चुकीच्या नियोजनात सामील असलेल्या संबंधित अधिकार्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.