वेध
विजय निचकवडे
courtesy आम्ही सौजन्य विसरत चाललो आहोत. शासकीय नोकरीत असलेल्यांच्या कृतीतून याचे दर्शन घडल्यास जनता आणि प्रशासनातील समन्वय नक्कीच चांगला राहू शकतो. विशेषत्वाने जेथे सामान्य जनतेसोबतच राहून काम करावे लागते, तेथे सौजन्याची जाणीव असायलाच हवी. मात्र, काही जण हे विसरत चालले आहेत. सौजन्य सप्ताह साजरा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांचे पुढे आलेले प्रताप बरेच काही सांगून जातात.
राज्य परिवहन महामंडळाची लाल गाडी आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दळणवळणाची प्रमुख व्यवस्था म्हणून आम्ही त्याकडे पाहतो. खेडोपाडी जाण्यासाठी याच एसटी बसचा आधार आम्हाला असतो. या लेकुरवाळ्या एसटीमध्ये कधीकाळी सौजन्य दिसून येत होते. प्रवाशांशी आपुलकीने बोलणारे कर्मचारी डोळ्यास पडत होते. मात्र, आज महामंडळाच्या एसटी गाड्या जशा बदलल्या तशाच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकतासुद्धा बसलली. आता महामंडळाच्या एसटी बसमध्ये वाहक म्हणून काम करणाऱ्या महिलांचा आविर्भाव काही वेगळाच असतो. त्यांच्या बोलण्यातून आपुलकीचे दोन शब्द जरी ऐकायला आले, तरी धन्य झाल्यासारखे वाटेल, अशी परिस्थिती आज एसटीची आहे. एसटीत प्रवास करणाऱ्यांवर आपण उपकार करतो; कदाचित असाच आवेश त्यांचा असतो. यातून ज्या काही घटना पुढे आल्या, त्या महामंडळाला चिंतन करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.
एका महिला वाहकाने दुसऱ्या पुरुष वाहकाला शिवीगाळ केली. महिला वाहकाची मुजोरी एवढी की, चूक असतानाही पोलिसात जाऊन तक्रार करून मोकळी झाली. शेवटी बदलीपर्यंत प्रकरण आल्याने विषय मिटविला गेला. एका महिला वाहकाने तर विद्यार्थिनीचे केसच ओढून तिला मारहाण केली तर दुसरीने चिल्लर पैशाच्या कारणावरून एका तरुणाला भर बसस्थानकात प्रचंड मार दिला. या सगळ्या घटनांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर आले आणि एसटी महामंडळातील महिला वाहकांची वागणुकीची चर्चा सुरू झाली.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतात. महिलांना समान संधी मानणारे आम्ही आहोत. पण महिलांच्या या मुजोर व्यवहाराचे काय? एक वाहक म्हणून आपली काय जबाबदारी आहे, याचे भान त्यांना का नसावे? एखादा प्रवासी चुकला असेल, अडचणीत असेल तर त्यावर मारहाण किंवा केस ओढून वाद घालणे हाच उपाय योग्य आहे का? एकीकडे सामान्य लोकांची म्हणून गवगवा केला जातो आणि दुसरीकडे हा व्यवहार, विसंगत असाच वाटतो. महिला म्हणून आम्ही काहीही करू शकतो, असा आविर्भाव या वाहकांमध्ये असेल तर नक्कीच त्यांच्या कर्तव्याची जाणीव वरिष्ठांनी त्यांना करून देणे गरजेचे आहे.
राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी सौैजन्य सप्ताह साजरा करतो. प्रवाशांशी एक दिवस गोड बोलले जाते, फूल देऊन त्यांचे स्वागत केले जाते. या सौजन्य सप्ताहात प्रवाशांशी कसे वागले पाहिजे, याचे धडेही दिले जात असावेत; मग हा सौजन्य सप्ताह केवळ एका आठवड्यापुरताच का, असा प्रश्न पडतो.courtesy सप्ताह साजरा करूनही मानसिकता न बदलणारे कर्मचारी असतील तर मात्र असे कितीही सप्ताह साजरे झाले तरी त्यांच्या अंगी सौजन्य येणार नाही हे नक्की! महामंडळ तोट्यात आहे म्हणून नवनवीन कल्पना विकसित करून अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. एसटीला ‘विठाई’सारखे नाव देऊन लोकांच्या मनावर वेगळेपण बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरीकडे महामंडळातील ‘या’ विठाई आपल्या कृतीतून प्रवाशांना दुखावणार असतील तर मात्र शासनाचे प्रयत्न निष्फळ ठरतील, यात दुमत नसावे. मान्यच आहे, विविध तऱ्हेच्या लोकांना समजून घेताना मनस्ताप होतही असेल तर महामंडळात काम करताना लोकांशी कायम संपर्क येणार, याची जाणीव ठेवून आपण नोकरीचे व्रत स्वीकारले असेल. तेव्हा आपला हेकेखोर स्वभाव जर आपण बदलू शकणार नसू तर सामान्यांची म्हणविली जाणारी एसटी सामान्यांची कशी असेल? प्रवासी आहेत, म्हणूनच आपण आहोत, हा भाव जोपर्यंत कर्मचाèयांच्या मनात दृढ होणार नाही, तोपर्यंत सौजन्य सप्ताहाचा हेतू साध्य होणार नाही, हे नक्की!
9763713417