सोयाबीन गंजीला आग ; १.६० लाखांचे नुकसान

काळी कारंजा शिवारातील घटना

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Kali Karanja Shivara काळी कारंजा शिवारातील शेतकर्‍याच्या शेतातील सोयाबीन गंजीस आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना १४ ऑटोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणात पीडित शेतकरी अजय मारोतीराव परळीकर रा. रंगारीपुरा कारंजा यांनी कारंजा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली असून, घटनेचा तपास सुरु आहे. अजय परळीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मालकीची मौजे काळी कारंजा येथील सर्वे नंबर ११० मधील ३ हेटर २४ आर शेती आहे. ही शेती त्यांनी बटई तत्त्वावर अनिल धनुजी दुर्गे रा. रंगारीपुरा, कारंजा यांना दिली होती. दुर्गे यांनी या जमिनीत सोयाबीन पीक घेतले होते आणि ते पिक सोंगून त्याची गंजी लावली होती. ११ ऑटोबर रोजी बटईदार अनिल दुर्गे यांनी पीक कापून शेतामध्ये मजुरामार्फत सोयाबीनची गंजी तयार करून ठेवली होती.
 
 
Kali Karanja Shivara
 
 
मात्र, १४ ऑटोबर रोजी सकाळी शेतात फेरफटका मारताना त्यांना गंजी जळालेली दिसली. त्यांनी तात्काळ शेतमालक परळीकर यांना फोनवरून माहिती दिली. परळीकर शेतात पोहोचले असता, गंजी पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि धूर सुरू होता. या घटनेत अंदाजे ४० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून, सद्यस्थितीतील बाजार भावानुसार सुमारे १.६० लाख रुपये इतके नुकसान झाल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. परळीकर यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट नाही आणि कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. मात्र, ही आग कशी लागली याचा सखोल तपास करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी अर्चना चिकटे घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी पंचनामा करून तहसीलदारांकडे सादर केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये चिंता पसरली असून, अलीकडील काळात शेतातील गंजी, कडबा आणि पिकांना लागणार्‍या आगींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या प्रकरणात नैसर्गिक कारण, वार्‍याचा प्रभाव, किंवा मानवी निष्काळजीपणामुळे आग लागली का?याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.