विजय आडे
उमरखेड,
maharajs-equestrian-statue-controversy : ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन असंख्य तरुण देशसेवेसाठी उभे राहतात, त्याच भूमीत आज राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक ठरणारा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा वादाच्या भोवèयात सापडला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा ऐतिहासिक प्रकल्प अखेर प्रत्यक्ष आकार घेत असताना आता सौंदर्यीकरणाच्या कामाला पेट्रोल पंपाच्या अतिक्रमणाचा अडथळा ठरत आहे.
रस्ते विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि नगर परिषद यांच्या कागदी घोडदौडीत या पुतळ्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न राजकीय वादाचा विषय बनला आहे. शहराच्या वैभवासाठी उभारला जाणारा हा स्मारक प्रकल्प आज राजकीय हेवे-दावे आणि नीतिमत्तेच्या व्यवहारात अडकला आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून त्या ठिकाणी सुरू असलेल्या पंप व्यवसायाने दोन पिढ्या गडगंज झाल्या, परंतु राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्यासाठी जागा सोडण्यास मात्र मनाची तयारी नाही, ही खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
पुतळा सौंदर्यकरणासाठी लढा देणारे कार्यकर्ते आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. सध्या पेट्रोल पंपासमोर बेमुदत उपोषण चालू आहे. समाज माध्यमांवर पेट्रोल पंपावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सुरू झाले असून, या विषयावर शहरात चर्चेची ठिणगी पेटली आहे. येणाèया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद वेगळाच रंग घेत असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा जो ऐक्य, स्वाभिमान आणि नीतिमत्तेचा संदेश देतो, त्याच पुतळ्यासाठी आज नीतिमत्तेचा बाजार मांडला जात आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. उमरखेड शहराच्या सन्मानासाठी हा वाद शांततेने मिटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अभिमानाने उभा राहावा, हीच सर्व नागरिकांची अपेक्षा आहे.