पहाड फरीद दर्गाह येथे प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणूक करा

*वफ मंडळाकडे निवेदनाद्वारे मागणी

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर, 
Pahad Farid Dargah : गिरड येथील पहाड फरीद दर्गाह येथे प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला असून ग्रापंने हा विषय पुढील कारवाईसाठी वफ मंडळाकडे वर्ग करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य वफ मंडळाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे.
 
 
SAMUDRPUR
 
 
 
पहाड फरीद दर्गाह येथे प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याबाबतचे निवेदन उपसरपंच मंगेश गिरडे आणि ग्रामस्थांनी ग्रापंकडे दिले. या निवेदनात दर्गाहच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता, सुव्यवस्था आणि जबाबदारी वाढविण्यासाठी सक्षम प्रशासकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर ग्रामपंचायतच्या सभेत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान सदस्यांनी एकमताने पहाड फरीद दर्गाहवरील प्रशासकीय अधिकारी नेमणुकीचा विषय हा ग्रापंच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे अशा धार्मिक संपत्तीशी संबंधित विषयावर निर्णय घेण्याचा व कारवाई करण्याचा अधिकार त्यासंबंधीत असलेल्या संस्थेला आहे, असे सभेने स्पष्ट केले. त्यामुळे ग्रापंने हा विषय पुढील कारवाईसाठी वफ मंडळाकडे वर्ग करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्यानंतर सदर निवेदन मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले. यासोबतच सभेचा ठरावही संलग्न करण्यात आला आहे. वफ मंडळाने तातडीने दर्गाहच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यत केली आहे.
 
 
काही ग्रामस्थांनी ग्रापंकडे पहाड फरीद दर्गाह येथे प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणुकीची मागणी केली. मात्र, याबाबतचे अधिकार ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली येत नसल्याने सदर मागणी ही त्या संबंधित अधिकार असलेल्या वफ बोर्डाकडे मागणी करण्याचा प्रस्ताव वर्ग करण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण बालमवार यांनी बोलताना सांगितले.
 
 
ग्रापंमध्ये पहाड फरीद दरग्यावर प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणूक संबधी ग्रापं सभेत काही ग्रामस्थांनी मागणी केल्याचे कळते. यासंबंधी वफ बोर्डाकडे सुद्धा तक्रार केली आहे. मात्र, प्रशासकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे नेमके काय कारण आहे. कोणत्या कारणास्तव ही मागणी केली हे माहीत नाही. पण, मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, वेळोवेळी दरग्यासंबंधी निवेदन देऊन बदनामी करणे हा योग्य प्रकार नाही, अशी प्रतिक्रीया पहाड फरीद दरगाहचे अध्यक्ष करीमुद्दीन काजी यांनी बोलताना दिली.