नागपूर,
prem-lal-patel : सध्याच्या घडीला जागतिक आव्हाने, हवामान बदल आणि इतर आव्हानांमुळे संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे अधिक कठीण झाले आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढवणे नितांत आवश्यक असल्याचे मत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. प्रेम लाल पटेल यांनी व्यक्त केले.
रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जागतिक मानक दिनानिमित्त भारतीय मानक ब्युरो द्वारे आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी बीआयएस संचालक हेमंत आडे, सहसंचालक रौनक सुखदेव, नीरीचे शास्त्रज्ञ गिरीश पोफळी, आयआयएमचे प्रा. राजीव अग्रवाल, वाहतूक उपायुक्त लोहित मतानी, व्हीएनआयटीचे डीन (संशोधन आणि सल्लागार) डॉ. यशवंत कटपटल, बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे महाव्यवस्थापक भूषण अवाटे, आरसी प्लास्टो अँड पाईप्सचे अभियंता योगेश काटोलकर उपस्थित होते.
डॉ. पटेल पुढे म्हणाले की, भारताने हवामान कृती, डिजिटल ट्रांसफार्मेशन, दूरसंचार इत्यादी क्षेत्रात काम केले आहे. तथापि, विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्यानेच जगातील लोकांचे जीवनमान सुधारू शकते. नीरीचे मुख्य शास्त्रज्ञ गिरीश पोफळी यांनी जागतिक सहकार्याचे महत्त्व सांगितले. वाहतूक विभागाचे उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले की, वाहतूकीचे नियम न पाळल्यास बहुतेक अपघात होतात. यात प्रामुख्याने विना हेल्मेटमुळे सर्वाधिक नुकसान होते. प्राध्यापक राजीव अग्रवाल, यशवंत कटपटल आणि भूषण अवाटे यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध संस्था, कंपणीचे प्रतिनिधी व अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.