गडचिरोली,
Prosperous Panchayat Raj Campaign जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व आरमोरीचे गटविकास अधिकारी मंगेश आरेवार यांनी 13 ऑक्टोबरला आरमोरी तालुक्याच्या देलोडा बु. ग्रामपंचायतीला भेट दिली. गावातील नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा घेतला. भेटीदरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या मुख्य उद्देशाच्या अनुषंगाने 7 समितींच्या गटप्रमुखांसोबत ग्रामपंचायतीचे स्वमूल्यांकन प्रश्नावलीच्या आधारे सविस्तर आढावा घेतला. नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये कोणती कामे करणार आणि आजपर्यंत केलेले काम याबद्दल सरपंच अविनाश खेवले यांच्यासोबत चर्चा केली.

सीईओ सुहास गाडे यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून शिक्षणाबाबत माहिती घेतली. त्यानंतर अंगणवाडी केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांची व अंगणवाडी सेविका यांची माहिती घेतली व त्रुटीबद्दल सूचना केल्या. आरोग्य उपकेंद्रातील सुविधांची पाहणी करून त्रुटीबद्दल समुदाय आरोग्य अधिकार्यांना सूचना केल्या, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी केली. नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी ग्राम पंचायतच्या अधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्यांनी विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी निधीची मागणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायतीची कर वसुली सध्या 41 टक्के असून तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मंगेश आरेवार यांनी दिली. आयुष्मान भारत कार्डबाबत उपसरपंच प्रमोद भोयर व ग्रामपंचायत सदस्य अर्चना जनगणवार यांनी दिली. नळ योजनेच्या पाणीपुरवठ्याबाबत जलसुरक्षक डंबाजी कल्सार, घनकचरा व्यवस्थापनाबाबत घंटागाडी चालक देवराव सयाम, आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र चालक नाशिकेत गुरनुले यांच्याकडून माहिती जाणली.भेटीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य स्नेहा राऊत, केवळ गेडाम, हसीता सहारे, संतोषी ठाकरे, शिल्पा चौधरी, डाक्रम बांगरे, तुलाराम गेडाम, शंकर जवादे व ग्राम पंचायतीचे कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते.