संघावाचून कोण स्वीकारेल काळाचे आव्हान : विवेक कवठेकर

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
vivek-kavathekar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघविचारांना आज शासन, प्रशासन व समाजात बरीच अनुकूलता आलेली दिसते. त्यासाठी शंभर वर्षांची संघस्वयंसेवकांनी साधना कारणीभूत आहे. काळाच्या कसोटीवर संघ खरा उतरल्याचे हे लक्षण आहे. या शंभर वर्षात संघाने उपेक्षा, उपहास, विरोध, संघर्ष, स्वीकार आणि सहयोग अशा सहा टप्प्यांतून प्रवास केला. संघ करीत असलेला स्वदेशीचा पुरस्कार, समरसतेचा आग्रह, पर्यावरण रक्षणाचे उपक्रम, नागरी कर्तव्याविषयीचा जागरण आणि कुटुंब प्रबोधन हे केवळ भारतीय समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे असे नव्हे तर जगसुद्धा मोठ्या आशेने संघाच्या या विचारांकडे पाहते आहे. जागतिकीकरण, व्यापारीकरणाच्या स्पर्धेत माणूसपण हरवत चाललेल्या वैश्विक समाजाला संघ मांडत व आचरत आलेला ‘वसुधैव कुटुंबकम्चा, सर्वेपि सुखिन: सन्तु’ चा विचारच तारणारा आहे, असे प्रतिपादन संस्कार भारतीचे प्रांत महामंत्री विवेक कवठेकर यांनी येथे केले.
 
 
 
y14Oct-Kawathekar
 
 
 
कळंब नगर संघाच्या वतीने रविवार, 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून इंदिरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य नीळकंठ नरुले आणि प्रमुख वक्ता म्हणून विवेक कवठेकर उपस्थित होते. पुढे बोलताना विवेक कवठेकर म्हणाले, आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 1920 साली काँग्रेसच्या अधिवेशनात बाजारीकरणाच्या विरोधात ठराव मांडण्याचे सुचविले होते. आज शंभर वर्षांनंतरही त्यांच्या त्या विचारांचीच मानवतेला कधी नव्हे इतकी आवश्यकता भासत आहे. संघविचार घेऊन समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाèया स्वयंसेवकांनी सेवाकार्यांच्या माध्यमातून, ‘कमायेगा वह खिलायेगा’चा विचार मांडून एकात्म मानवदर्शन घडविले आहे. प्रत्येक मोठ्या समस्येच्या प्रसंगी संघ समाजाच्या पाठीशी उभा राहिला. संघावाचून कोण स्वीकारेल काळाचे आव्हान ही ओळ सार्थ करीत आलेल्या स्वयंसेवकास प्रत्येक जण आपला बंधुबांधव वाटतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापनेनिमित्त या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर संघकार्याचा विस्तार व कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता नागरिक कर्तव्य व स्वदेशी या पाच मुद्यांना अनुसरून संघ आपली शताब्दी साजरी करीत आहे, हेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्रा. नीळकंठ नरुले यांनी, संघाचे कार्य समाजोपयोगी असून निश्चितच येणाऱ्या काळात आपण संघाचा सक्रीय स्वयंसेवक होऊ, असे सांगत संघकार्यास व शताब्दी वर्षातील कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. उत्सवापूर्वी यावेळी पोलिस ठाण्याच्या बाजूला जिल्हा परिषद प्रांगणातून घोषासह पथसंंचलनाला सुरुवात झाली. ते पंचवटी चौक, इंदिरा चौक, राम मंदिर, गांधी चौक, नेहरू चौक, पोळ्याचा मारुती, मोठा मारुती, पाण्याची टाकी, चिंतामणी गॅस समोरील मार्गावरून परत संघस्थानी आले.
 
 
या मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि रांगोळ्या व दिवे लावून मोठ्या उत्साहाने पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले. या विजयादशमी उत्सवाला कळंब नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके पूर्णवेळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंड संघचालक सुरेश कठाळे यांनी केले. सांघिक गीत विनोद आसुटकर, सुभाषित अंकुल धुमे, अमृतवचन निशांत गावंडे व वैयक्तिक गीत गोलू चौधरी यांनी सादर केले. पाहुण्यांचा परिचय तालुका कार्यवाह गणेश काळे यांनी करून दिला.