विजयादशमी उत्सव शक्तीपूजेचा सण : संजय दंडे

ढाणकी नगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
ढाणकी, 
sanjay-dande : आपला भारत हा सणांचा देश आहे, गणपती उत्सव, पितृपक्ष, नवरात्री असे सण आपण एका महिन्यात साजरे केले. या सणांमागे वैज्ञानिक, आध्यात्मिक उद्देश असतात. सण साजरे करणे म्हणजेच आनंद व्यक्त करणे आहे. अशा उत्सवांचे महत्व संघाने आपल्या कार्यपद्धतीतही समाविष्ट केले आहे. त्याच कार्यपद्धतीत विजयादशमी हा एक महत्वाचा उत्सव आहे, हा उत्सव शक्तीपूजेचा दिवस आहे, असे प्रतिपादन ‘सक्षम’चे प्रांत पदाधिकारी संजय दंडे यांनी केले.
 
 
y14Oct-Dhanaki
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढाणकी नगराच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले, संघ कोणाच्याही विरोधात नाही. संघ आणि समाज हे वेगवेगळे नसून एकच आहेत. संघाला अपेक्षित चारित्र्यसंपन्न व्यक्ती निर्माण करणे, भारतीय समाजाला देशाच्या प्रवाहात आणणे हेच संघांचे कार्य आहे. पर्यावरणाची काळजी घेणे, कुटुंबातील सर्व सदस्यांनी कुटुंबव्यवस्था टिकवणे, स्वदेशीचा वापर करणे, आपण भारताचे नागरिक आहोत तर मग नागरी कर्तव्याची जपणूक करून राष्ट्र परमवैभवसंपन्न करणे हाच उद्देश संघाचा आहे. हा उद्देश संघाच्या प्रार्थनेत आहे. ‘परमवैभवं नेतुं एतत् स्वराष्ट्रम्’ या ओळीप्रमाणे संघ कार्य करत असतो, असेही ते म्हणाले.
 
 
यावेळी उत्सवाचे प्रमुख अतिथी उत्तम शिरगरे यांनीसुद्धा, भारतातील भ्रटाचार देश पोखरून टाकत असून, भ्रष्टाचार संपला पाहिजे, अस्पृश्यता संपली पाहिजे. तरुणांनी निर्व्यसनी व्हायला पाहिजे, असे बोलून बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वावलंबी झालो पाहिजे, असा मोलाचा संदेश यावेळी दिला. सुरवातीला संघाच्या स्वयंसेवकांनी दंड, नियुद्ध, व्यायामयोगाचे रोमहर्षक प्रात्यक्षिक, सांघिक गीत सादर करून उपस्थितांची मने आकर्षित केली. संघाच्या शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या पथसंचलनाने ढाणकीकरांची मने अभिमानाने भरून आली. जागोजागी नागरिक आणि विविध संघटनांनी पथसंचलनाचे स्वागत केले. भारतीय किसान संघ, दुर्गावाहिनी, बजरंग दल, भाजपा, शिवप्रतिष्ठान, या संघटना सहभागी होत्या.
 
 
यावेळी मंचावर, ढाणकी तालुक्याचे कार्यवाह महारुद्र बिबेकर हेही उपस्थित होते, प्रास्तविकातून दिगंबर बल्लेवार यांनी संघांचे कार्य ढाणकी शहराच्या सर्व वस्त्यांमध्ये पोहचले आणि शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात स्वयंसेवक होतील, असा प्रयत्न संघ करणार असे सांगितले. वैयक्तिक गीत संजय देवधर, सांघिक गीत परमेश्वर बच्चेवार सादर यांनी केले.