अमरावती विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता राखण्यात असमर्थ

अभाविप करणार लक्षवेधी आंदोलन; महाविद्यालये बंद व विद्यापीठावर मोर्चा

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
अमरावती, 
amravati-university विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या ७ नोव्हेंबरला महाविद्यालय बंद आंदोलन करणार असून १४ नोव्हेंबरला विद्यापीठावर मोर्चा काढणार आहे. गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या कामकाजातील ढिसाळपणा, निष्क्रियता नजरेस येत असून विद्यार्थ्यांच्या विषयांवर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचे काम चालविले आहे. या निष्काळजी वृत्तीमुळे लाखों विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य अंधारात जात असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
 
 
amravati-university
 
विद्यापीठाची जी प्रवेश प्रक्रिया जुलै ते ऑगस्टमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, ती अलीकडे सप्टेंबरपर्यंतही पूर्ण झालेली नाही. परीक्षेच्या काळात हॉल तिकीटचे प्रश्न असो, परीक्षा केंद्रावरची असुविधा असो यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा कितीतरी अडचणींना आज विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यानंतरही जेव्हा निकालाची वेळ येते, तेव्हा सुद्धा विद्यापीठ प्रशासन निकाल ठराविक वेळेत लावणे असो अथवा योग्य लावणे असो यासाठी अपयशी ठरत आहे. अशा सर्व विद्यार्थी केंद्रित महत्त्वाच्या विषयांना घेऊन येणार्‍या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात विद्यापीठस्तरीय मोर्चा काढणार आहे. या मोर्चात प्रामुख्याने प्रवेश, परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम, पदभरती, शिष्यवृत्ती, वसतिगृह, एनईपी क्रियान्वयन आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे छात्र संघ निवडणुका, ज्या होण्याने विद्यार्थ्यांचे नेतृत्व बाहेर पडते व प्रत्येक विद्यार्थी कॅम्पसमध्ये येण्यासाठी आतुर असतो, अशा विविध विषयांचा समावेश राहणार आहे. amravati-university या विद्यापीठ मोर्चाचे काही टप्पे ठरवले आहे. त्यातले तीन टप्पे झालेले असून आता २६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर विद्यार्थी संपर्क अभियान, ७ नोव्हेंबर महाविद्यालय बंद आंदोलन आणि १४ नोव्हेंबरला विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या छात्रनेता संमेलनात या सर्व बाबींची विस्तृत माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला अभाविपच्या विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, अमरावती विद्यापीठ मोर्चा प्रमुख रिद्धेश देशमुख, विदर्भ प्रांत मिडिया सहसंयोजक कैवल्य रूद्रे, अमरावती महानगर सहमंत्री गौरी भारती आणि अमरावती विभाग संयोजक ऋषभ गोहने यांची उपस्थिती होती.