राजस्थान,
Balotra Sindhari highway accident राजस्थान जैसलमेरमधील एसी बस दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरलेले असतानाच, राजस्थानात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बालोतरा-सिणधरी मेगा हायवेवर सडा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रेलरने स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओमधील चार मित्र जळून ठार झाले, तर एक तरुण गंभीर भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. प्रचंड वेगात असलेल्या ट्रेलरने समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला जबर धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांचे फ्युएल टँक फुटले आणि क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी दोन्ही वाहने वेढली. स्कॉर्पिओमध्ये एकूण पाच तरुण होते. धडकेनंतर गाडीमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच जवळील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केल्याने मदत करणे कठीण बनले. घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. पण अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचायच्या आतच चार तरुणांचा मृत्यू झाला होता.
या अपघातात एक तरुण गंभीर भाजला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मृत तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.अपघातानंतर ट्रेलर आणि स्कॉर्पिओ दोन्ही वाहनांचे अवशेष रस्त्यावर विखुरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रकरणी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.राज्यात अपघातांची वाढती संख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणीही जोर धरत आहे.