चंद्रपूरच्या दीक्षाभूमीत लोटला भीमसागर

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur-deekshabhoomi : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी गुरूवार, 16 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षा भूमीला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी उसळली. महानगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या त्यांच्या अस्थीकलशासह भिक्खू संघ आणि समता सैनिक दलाच्या शौर्यशील पथसंचलानाने महानगरात चैतन्य निर्माण केले. सकाळपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीच्या वाटेवर निघाले होते आणि सायंकाळपर्यंत हा परिसर निळाईने फुलला.
 
 
jk
 
येथील जटपुरा गेटमार्गे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोडा नाका ओलांडत मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचली. त्यात समता सैनिक दलाचे सैनिक सहभागी झाले होते. मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचल्यानंतर भदन्त आर्य नागार्जुन शुरेई ससाई यांच्या हस्ते बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेबांचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी प्रति कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेडे व संच, या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवर समस्त जनसमुह धम्ममय झाला.
 
 
 
यावेळी भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी, उपस्थित बौध्द बांधवांना धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनाच्या हार्दिक सुभेच्छा दिल्या. भदन्त नागसेन, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त धम्मसारथी, भदन्त अश्वजित, भिक्षुणी बोधीशिला, भदन्न तिस्म, भदन्त महानागा, भदन्त नागवंशा, भदन्त राहुल, भिक्षुणी संपत्रिया, भिक्षुणी शिलानंद, भदन्त कुमार कश्यप आणि भिक्खू संघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भदन्त नागसेन म्हणाले, बुध्दाचा धम्म हा समता प्रस्थापित व शांतीचा मार्ग दाखविणारा आहे. तर भदन्त धम्मबोधी म्हणाले, धम्म चळवळ अधिक गतीमान करायची असेल तर धम्मानुसार सर्वांनी आचरण केले पाहिजे. शुरेई ससाई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दाचा धम्म विश्वात गतिमान केला आहे, जो विश्वाला शांतीकडे घेऊन जाणार आहे. संचालन डॉ स्निग्धा सदाफळे यांनी, तर आभार डॉ. एन. एस. रामटेके यांनी मानले.