चंद्रपूर,
ramdas-athawale : आंबेडकरी एकतेसाठी सर्व गटांनी एकत्र यावे असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करावे, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमिवर आयोजित 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाकरिता रामदास आठवले गुरूवारी चंद्रपुरात आले होते. यावेळी विश्रागमृह येथे आयोजित पत्रपरिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. आठवले म्हणाले, आरपीआयला पुढे नेण्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात येताना मला विशेष आनंद होतो. रिपब्लिकन पक्ष कानाकोपर्यात नेण्याची संधी मला मिळाली आहे. आता या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एनडीएमध्ये आल्यावर आमच्या समाजाची अनेक कार्य पूर्णत्वास गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द़ृष्टी देशाला विकासाकडे घेऊन जात आहे, असे त्यांनी सांगितले.
हिंसक मार्गाने न्याय मिळत नाही. त्यामुळे दलित आदिवासी नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारून लोकशाही पध्दतीने लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशांवर बुट फिरकविण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. जे संविधान मानत नाही, अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव द्यावा यासाठी मी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रिपाईचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय आगलावे उपस्थित होते.