नवी दिल्ली,
Diwali gift for employees दिवाळी जवळ येत असताना ऑफिसमध्ये कर्मचारीही सणासुदीच्या आनंदात सहभागी होत आहेत. नुकताच एका टेक कंपनीत, इन्फोएज्डमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू दिल्या गेल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटले, ‘दिवाळी गिफ्ट कसे द्यायचे ते यांच्याकडून शिका’ आणि ‘तुमच्या ऑफिसमध्ये मिळत असेल सोनपापडी, आम्हाला मिळतात’ असे लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की कंपनीने कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर व्हीआयपी ब्रँडच्या मोठ्या सुटकेस बॅग्स ठेवल्या आहेत. या बॅग्समध्ये मिठाई आणि दिवे देखील समाविष्ट आहेत. मोठ्या बॅगच्या आत आणखी एक लहान बॅग आहे, ज्यामुळे हे दिवाळी गिफ्ट आणखी खास बनले आहे. दरम्यान, इतर कंपन्यांमध्ये देखील कर्मचाऱ्यांना सणाच्या दिवशी खास भेटवस्तू देण्यात येत आहेत. काहींना एअर फ्रायर मिळाले आहेत, तर रिलायन्स जिओने कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रूट्ससह गिफ्ट हॅम्पर दिला आहे. अनेक कंपन्यांनी परंपरेनुसार सोनपापडी देत सणाची सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर अशा भेटवस्तूंच्या व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत आणि लोकांच्या उत्साहात भर घालत आहेत.