सर्कसपूर,
wardha-news विदर्भाच्या शेतशिवारात सध्या पांढरं सोनं आणि सोयाबीनच्या काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. हा काळ शेतकर्यांसाठी केवळ आर्थिक उलाढाल नसून त्यांच्या जीवन-मरणाचा आणि पुढील वर्षाच्या स्वप्नांचा आधार असतो. अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर शेतकर्यांनी भूमी माता अर्थात सीतामाईचे मनोभावे पूजन करून आपल्या पिकांची वेचणी आणि काढणी सुरू केली आहे. ही केवळ एक पारंपरिक प्रथा नसून नैसर्गिक संकटातही धरती मातेवरील शेतकर्यांच्या अढळ निष्ठेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.

नेत्यांनी निवडणुकीपुर्वी दिलेली आश्वासने वार्यावर विरून जातात. पण, आमच्या धरती मातेचं तसं नाही याच दृढ विश्वासातून शेतकर्यांनी अगदी साध्या मातीच्या दिव्यांची आणि फुलांची आरास करून जमिनीची पूजा केली. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस यासारख्या संकटांनी पिकांचे मोठे नुकसान केले असले तरी शेतकरी आपली निष्ठा कायम ठेवतो. पूजनाच्या वेळी शेतकर्यांच्या चेहर्यावर एकच भावना असते—तू भरभरून देतेस माते! तुझ्या कृपेनेच आम्ही जगतो. सीतामाईच्या कृपेने पीक पदरात पडले असले तरी शेतकर्यांच्या स्वप्नांना बाजाराच्या अस्थिरतेचे आणि शासकीय धोरणांच्या आडमुठेपणाचे ग्रहण लागले आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्यांची मेहनत मातीमोल ठरत आहे. आजही शेतकरी आपली खंत व्यत करत भूमी माता आम्हाला कधीच निराश करत नाही. wardha-news पण, सरकारची धोरणे मात्र आम्हाला जगू देत नाहीत. एकीकडे उत्पादन खर्च वाढतो दुसरीकडे योग्य दर मिळत नाही. आम्ही जगायचं कसं? असे म्हणतात. आज शेतकरी कुटुंबांचे हाल होत आहेत. योग्य दर न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढतो ही केवळ शेतकर्यांची समस्या नाही तर संपूर्ण समाजासाठी धोयाची घंटा आहे. शेतकर्यांच्या श्रमाचा आदर करून त्यांच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक आणि योग्य बाजारभाव त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आज आपल्या भूमी मातेच्या पायावर डोके ठेवून केवळ सरकारी धोरणांमध्ये सुधारणेची अपेक्षा करत आहे.