नागपूर,
rtmnu-nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यूत्तर गृहविज्ञान विभागात उद्योजकता आणि आरोग्य प्रदर्शन गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण नैसर्गिक उत्पादनांसह खमंग खाद्यपदार्थांची मेजवानी नागपूरकरांना मिळाली. सकाळी ११ ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत आयोजित या प्रदर्शनाला विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते उद्योजकता आणि आरोग्य स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. वंदना धवड, माजी विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्योजकता प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले मातीचे दिवे, कागदाचे लिफाफे, ज्यूटचे साहित्य, कॉस्मेटिक ज्वेलरी, नैसर्गिक शेतीतील उत्पादने, प्राणिशास्त्र विभागातील वर्मी कंपोस्ट खत, सेरीकल्चर विभागातील मध, दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेले फराळाचे विविध साहित्य, विविध प्रकारचे कापड, पूजेचे साहित्य, घरी तयार केलेले तिखट, विविध प्रकारचे लोणचे यासह विविध उत्पादनांच्या स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये विभागातील विद्यार्थिनींचे ८ स्टॉल्स तर बाहेरील १८ स्टॉल्सचा समावेश होता. सर्वच स्टॉल्स वरील विविध वस्तू खरेदी करीत प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला. विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या निर्देशानुसार सशक्त नारी सशक्त परीवार अभियानाच्या राष्ट्रीय स्तरावरील महिला आरोग्य उपक्रम अंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी तसेच पोषण आहार समुपदेशन कार्यक्रम आरोग्य प्रदर्शनात घेण्यात आला.