मोर्शी,
fraud-in-name-of-kyc ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. बचत गटांमध्ये शिक्षित महिलांसोबतच अशिक्षित महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने याचा फायदा काही स्वार्थी महिला व पुरुष घेत असून असाच प्रकार मोर्शी शहरात सुद्धा नुकताच घडला आहे.

एका फायनान्स कंपनीतील युवतीने तीन महिलांना केवायसी करायचे असे सांगून त्यांच्या बोटाचा अंगठा व रजिस्टरवर स्वाक्षरी घेऊन त्यांच्या नावावर १ लाख ३३ हजार रुपये कर्ज उचलल्याची तक्रार नुकतीच प्राप्त झाली आहे. शहरातील वार्ड क्रमांक १४ येथील सुनीता हटवार यांनी मागील दहा वर्षापासून एका फायनान्स कंपनीकडून दुग्ध व्यवसायाकरिता म्हशी विकत घेण्यासाठी बरेच वेळा कर्ज घेतले होते. त्या कर्जाची त्या नियमित परतफेड करत असल्याने पुन्हा कर्ज काढण्यासाठी त्यांनी ४ जून २०२५ रोजी म्हशी विकत घेण्याकरिता व दुग्ध व्यवसायकरिता ७३ हजार ५१४ रुपये कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा हप्ता आठवड्याला ९२० रुपये त्या नियमित भरत होत्या. या कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी एक युवती त्यांच्याकडे येत होती व वसूल झालेली कर्जाची रक्कम कंपनीकडे जमा करीत होती. fraud-in-name-of-kyc दरम्यान सदर युवतीने सुनीता हटवार यांना केवायसी करण्याकरिता बोलावल्याने १९ फेब्रुवारीला सुनीता या केवायसीसाठी कार्यालयात गेल्या, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा अंगठा घेतला तसेच रजिस्टरवर सुद्धा सही घेतली असल्याचे सुनीताने तक्रारीत म्हटले. नंतर सुनीताकडे वसुली अधिकारी कर्जाचा हप्ता मागण्यासाठी आले असता त्यांनी तुमच्याकडे ४८ हजार २३६ रुपयाचे कर्ज असून त्याचा हप्ता ६०० रुपये बाकी असल्याचे सांगितले. मात्र सुनीताने हे कर्ज उचललेच नाही, असे सांगितल्याने त्या वसुली अधिकार्यांनी त्यांनी दिलेला अंगठा व रजिस्टरवर असलेली स्वाक्षरी दाखवली. यावरून आपली फसवणूक झालेली आहे, असे लक्षात आले.अशाच प्रकारची घटना सिमरन परवीन शेख जमीर यांच्यासोबत सुद्धा घडली असून त्यांच्या नावावर सुद्धा ३५ हजार रुपये व वंदना मारोतराव समरित यांच्या नावावर ४८ हजार रुपये कर्ज परस्पर उचलल्याच्या दोन घटनाही समोर आल्या आहेत. सुनीता हटवार, सिमरन शेख, वंदना समरित यांनी मोर्शी पोलिस स्टेशन येथे लेखी निवेदन देऊन न्याय मागितला आहे.