गडचिरोली,
local-body-elections : गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांसाठी सर्वंकष तयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या 51 जागा तसेच पंचायत समितीच्या 102 जागांवर उमेदवार उभे करण्याची ग्वाही पक्षाने दिली आहे. या पृष्ठभूमीवर पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांना आपली उमेदवारी नोंदविण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे, अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी दिली.

यावेळी माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलींद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. रमेश बारसागडे म्हणाले की, इच्छुक उमेदवारांनी 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज संबंधित पदाधिकार्यांकडे सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या जागांसाठी अर्ज गडचिरोली शहर (ख) मंडल अध्यक्षांकडे, आरमोरी नगर परिषदेच्या जागांसाठी आरमोरी मंडल अध्यक्षांकडे, तर वडसा नगर परिषदेच्या जागांसाठी वडसा मंडल अध्यक्षांकडे अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी इच्छुकांनी आपले अर्ज भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा अथवा संबंधित स्थानिक मंडल अध्यक्षांकडे द्यावेत. पंचायत समितीच्या जागांसाठी अर्ज संबंधित मंडल अध्यक्षांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्रा. बारसागडे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून प्रत्येक नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. पक्ष संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारी अर्जांची छाननी करून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात येतील. वेळेत अर्ज सादर करून पक्ष संघटनाशी समन्वय साधावा, असे आवाहनही त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना केले.