गडचिरोली,
milind-narote : खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक सकारात्मक ऊर्जा आणि सुदृढ जीवनशैली मिळते. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढत नाही, तर सामूहिक कार्य, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि निकाल स्वीकारण्याची वृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या गुणांची वाढ होते. टेबल टेनिससारखा खेळ एकाग्रता आणि चपळता वाढवतो, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा 2025-26 चा उद्घाटन सोहळा आज, 16 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. नरोटे बोलत होते. दोन दिवस चालणार्या या स्पर्धेत नागपूर विभागातील 14, 17 आणि 19 वयोगटातील मुला-मुलींच्या गटातील अनेक युवा खेळाडू सहभागी झाले आहेत.
आमदार डॉ. नरोटे पुढे म्हणाले, या स्पर्धेतून निवडले गेलेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या आत्मविश्वास आणि जिद्दीवरून मला खात्री आहे की, ते आपल्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्वल करतील. त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विभागीय स्तरावरील या स्पर्धेचे गडचिरोलीत आयोजन होणे ही स्थानिक क्रीडा संस्कृतीला चालना देणारी आणि जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणारी महत्त्वाची घटना ठरली आहे. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा विभागाचे अधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक व मान्यवर उपस्थित होते.