तभा वृत्तसेवा
भंडारा,
Balodyan-jio Tower : गावातील लोकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या सोडविण्यासाठी कधीही तत्परता न दाखविणा-या ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र जिओ कंपनीचे टॉवर उभारण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू केले आहे. विशेष एका बालोद्यानात टॉवर उभारण्याचा घाट घातला जात असून परिसरातील नागरिकांचा याला विरोध होत आहे. बालोद्यान मुलांना खेळण्यासाठी की ग्रामपंचायतीला अर्थाजन करण्यासाठी हे स्पष्ट व्हायला हवे.
खोकरला ग्रामपंचायतीच्या परिसरात रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता अनेक समस्या आहेत. परंतु त्या सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाचा फारसा कल दिसत नाही. अशावेळी मात्र लोकांना जिओ कंपनीची कनेक्टिव्हिटी मिळत नाही, हा विषय गांभीर्याने घेऊन थेट मुलांसाठी असलेल्या बालोद्यानातच जिओ कंपनीचे टॉवर उभरण्याचा ठराव चक्क ग्रामसभेत घेऊन नको त्या कामात तत्परता दाखविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. ही तत्परता कशामुळे हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.
ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार 90 टक्के ग्राहक खोकरला ग्रामपंचायती अंतर्गत जिओ कंपनीचे आहेत. कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने या ग्राहकांनी जिओ कंपनीकडे मागणी केली आणि कंपनीने ग्रामपंचायतीला जागा मागितली. ग्रामपंचायतीने सुद्धा तत्परता स्व.मेजर प्रफुल्ल मोहोरकर बालोद्यानात उभारण्यात परवानगी देऊन टाकली. विशेष म्हणजे या मोठया प्रमाणावर घरे आहेत. वेगवेगळ्या फ्लॅट स्कीम आणि अन्य वसाहतींच्या माध्यमातून हजारो लोक येथे राहतात. जो अर्ज ग्रामपंचायतीकडे टॉवरसाठी केला गेला, त्या अर्जवार कुठल्याही नागरिकाची स्वाक्षरी नाही.
अशावेळी नागरिकांची मागणी नसताना बालोद्याना टॉवर उभारण्याचा हा घाट कितपत योग्य आहे? याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. टॉवर भरल्यानंतर त्याच्या किरणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता उभारल्या जाणा-या टॉवर चा नागरिकांकडून विरोध होत आहे. बालोद्यानात टॉवर उभारण्याचे कारण काय? ज्या हेतूसाठी ही जागा आरक्षित आहे, तेथे ग्रामपंचायत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टॉवर कसे काय उभारू शकते असे म्हणत नागरिकांनी या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. आता ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना लोकांचे हित कशात याचा विचार करावा लागणार आहे.