वेध
crypto christians ‘मी मरणाच्या दारात होती, माझी किडनी खराब झाली होती. पण प्रभू येशूने मला बरे केले. प्रभू येशूचे कोटी-कोटी धन्यवाद’, असे म्हणून ती ‘आलेलुया...’ चा घोष करायला लागली. तिला तुम्ही धर्म बदलला का असे विचारल्यावर धर्म नव्हे तर जीवन बदलले असे उत्तर देऊन तिने धर्मांतरणाच्या उत्तराला मात्र बगल दिली. ही घटना सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या अंधारसांगवी या आडवळणाच्या गावातील आहे. याच परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत अफवा पसरवून दहा दिवसांपूर्वीच गणपती विसर्जन केल्याचा प्रकारही घडला होता. पातूर तालुक्याच्या लगत असलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथे दुसरी घटना आठ दिवसानंतरच समोर आली. येथेही, ‘येशूच्या प्रार्थनेला या. तुमचे घरगुती त्रास, दु:ख, आजार नाहीसे होतील. तुम्ही ख्रिश्चन व्हा, तुम्हाला एक लाख रुपये मिळतील’, असे सांगण्यात आले. दोन्ही घटनांची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. मात्र या दोनही घटनांमध्ये ज्यांच्याविरुद्ध गावकऱ्यांनी आरोप केला त्यातील बहुतांश जणांनी ते हिंदू असल्याचीच नोंद पोलिस दप्तरी केली. स्वाभाविकच या नोंदीमुळे समाजात संभ्रम निर्माण झाला. पण ही खेळी जुनीच असून अधिक धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माभिमानी व्यक्तीने याबाबत जागरूक आणि सतर्क असणे अत्यावश्यक आहे. मुळात अशी ओळख लपवून ख्रिश्चन असणाऱ्यांना क्रिप्टो ख्रिश्चन असे म्हणतात. असे क्रिप्टो ख्रिश्चन मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवून, भूलथापा व आमिष देऊन धर्मप्रसार करीत आहेत.

भारतीय संस्कृती ही विविध पंथ, संप्रदाय यांना सामावून घेणारी आहे. सहिष्णुता हा तर आपल्या संस्कृतीचा स्वभाव. पण याच सहिष्णू स्वभावाचा गैरफायदा क्रिप्टो ख्रिश्चन घेत असल्याचे दिसून येते. विविध छुप्या मार्गांसोबतच येशूच जगाचा तारणहार आहे, येशू सर्व समस्यांचे निराकरण करणारा आहे, अशा आशयाची पत्रके ग्रामीण व शहरी भागातील झोपडपट्टीत असलेल्या परिसरात वाटली जातात. अनेक वेळा हताश झालेल्या, शारीरिक किंवा मानसिक समस्येने ग्रासलेल्या व्यक्ती या पत्रकांना बळी पडून त्याचे धर्मांतरण झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मग असे धर्मांतरित क्रिप्टो ख्रिश्चन ओळख लपवून समाजात वावरतात. खरं म्हणजे क्रिप्टो ख्रिश्चनांचा मुख्य उद्देशच सभोवतालच्या लोकांना ख्रिश्चन करण्याचा असतो. त्यानुसार ते गावागावात जाऊन गावकऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधतात. तेथे येशूची प्रार्थना, उपासना केल्यावर दु:खं दूर झाली असे महिमा मंडन असणाऱ्यां पुस्तिकांचे वितरण करतात. अज्ञान, आजार, संकट, दारिद्र्याचा फायदा घेऊन ग्रामीण आडवळणाच्या गावातील लोकांना धर्मांतरित करणे हा एककलमी कार्यक्रम राबविणारे ‘क्रिप्टो’ एकीकडे आदिवासींच्या अज्ञानाचा तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा फायदा घेत अशिक्षित आदिवासीपर्यंत अफवा पसरवून त्यांना मूळ धर्माचरणापासून दूर करीत असल्याची ताजी उदाहरणे आहेत. कुठेतरी आपल्या रहिवासापासून दूर असलेली ही समस्या आता उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. कदाचित उघडकीस आलेल्या दोन घटना जरी असल्या तरी धर्मांतरणाचे हे ‘नेटवर्क’ किती खोलवर आणि कुठपर्यंत पोहोचले आहे याचा शोध घेणेे आवश्यक आहे. केवळ शोधच नव्हे तर ज्यांनी ख्रिश्चन म्हणून धर्मांतरण केले असेल अशांचा शोध घेऊन त्यांना संवैधानिक मार्गाने मिळालेल्या आरक्षणाचे निष्कासन शासनाने करावे.crypto christians मुख्यत: ज्या आदिवासी, मागासवर्गीय समाजाला या क्रिप्टो ख्रिश्चनांनी लक्ष्य केले आहे, त्या समाजातील समाजधुरिणांनी देखील विशेष काळजी घेेेणे आवश्यक आहे. धर्मांतरण हा केवळ धार्मिक विषय नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. शासनासह समाजाने या गंभीर समस्येकडे आताच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल, हे निश्चित. मुख्यत: शासनाने याची अधिक गंभीर दखल घेऊन धर्मांतरणबंदी कायदा करावा, कारण यावर अंकुश लावण्यासाठी आता कायद्याशिवाय गत्यंतर नसल्याचे अनेक घटनांमधून अधोरेखित झाले आहे.
नीलेश जोशी
9422862484