सिरोंचा,
Illegal sand mining case : सिरोंचा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकप्रकरणी महसूल विभागातील अधिकार्यांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल कारवाई करून बदलीची शिफारस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याची आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याची बातमी दैनिक ‘तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीनंतर खनन अधिकारी यांनी ती बातमी खोटी असल्याचा खुलासा केला होता. मात्र, पुढील चौकशीत तरुण भारतने प्रकाशित केलेले वृत्त अचूक आणि सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी तातडीने महसूल विभागातील जबाबदार अधिकार्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार अहेरीचे उपविभागीय अधिकारी यांनी 2 ऑक्टोबर रोजी मद्दीकुंठा आणि चिंतरेवला येथील रेतीघाटांवर मोका तपासणी केली. या तपासणीत तब्बल 15 हजार 665 ब्रास अवैध रेतीचा साठा आढळून आला. त्यासाठी अंदाजे 29 कोटी रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, रेती उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी 2 जेसीबी, 1 पोकलँड मशिन आणि 5 ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
चौकशीत महसूल विभागातील जबाबदार अधिकार्यांचा निष्काळजीपणा आणि नियंत्रणातील ढिलाई स्पष्टपणे समोर आली. तलाठी अश्विनी सडमेक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीघाटांची पाहणी न करता वरिष्ठांना अहवाल सादर न केल्याचे निष्पन्न झाले. मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे यांनी देखील नियमित पाहणी आणि नोंदवही ठेवण्यात कसूर केल्याचे चौकशीत दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी दोघांनाही 15 ऑक्टोबर रोजी निलंबित केले आहे.
संपूर्ण प्रकरणात नियंत्रण न ठेवल्याबद्दल तहसीलदार निलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्या बदलीची व शिस्तभंग कारवाईची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.
निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही : जिल्हाधिकारी
अवैध रेती उत्खननाबाबत जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला सजग राहण्याचे निर्देश देत, कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे. रेतीघाटांवरील अनधिकृत उत्खनन, वाहतूक आणि साठा यावर कठोर कारवाई सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.