स्वदेशी ‘वायरलेस बबल’ तंत्रज्ञानाकडे जगाचे लक्ष

- डॉ. प्रभात शर्मा यांनी भारताच्या ६जी नवोन्मेष क्षमतेचे केले जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
prabhat-sharma : नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या ‘भारत मोबाइल कॉंग्रेस’ च्या उद्घाटन सत्रात व्हीएनआयटी, नागपूरचे इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक तसेच सर्वक्ष कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक डॉ. प्रभात कुमार शर्मा यांनी भारताच्या डीप-टेक नवोन्मेष क्षमतेचे प्रभावी सादरीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, दूरसंचार सचिव डॉ. नीरज मित्तल आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांनी भारताच्या ६जी संशोधन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासातील वेगाने होत असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला.
 
 
 

WhatsApp-Image-2025-10-16-at-5
 
 
 
 
डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ‘सर्वक्ष’ हे स्टार्टअप रीकॉन्फिगरेबल इंटेलिजेंट सरफेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे ६जी नेटवर्कसाठी अत्यावश्यक ठरेल. हे तंत्रज्ञान वायरलेस सिग्नल्स अधिक अचूकपणे नियंत्रित करत असल्याने संचार सुरक्षितता, कव्हरेज आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढते. दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने हे स्टार्टअप नागरी आणि संरक्षण क्षेत्रासाठी स्वदेशी ‘वायरलेस बबल’ प्रणाली विकसित करत आहे.
 
 
आयएमसी २०२३ मध्ये पहिल्या प्रोटोटाइपपासून २०२५ मध्ये बाजारपेठेसाठी तयार उत्पादनापर्यंतचा प्रवास हा भारतातील शैक्षणिक संशोधनाचे उद्योगात रूपांतर होण्याचा आदर्श नमुना ठरला आहे. या स्टार्टअपने आरआयएस तंत्रज्ञानातील पाच पेटंट्स दाखल केले असून पुढील पिढीच्या एआय आधारित संचार प्रणालींकडेही वाटचाल सुरू केली आहे. यशानंतर डॉ. शर्मा यांना भारत-यूके विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिनिधिमंडळात सामील करून उच्चस्तरीय सहकार्य चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पी. एल. पटेल यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत प्राध्यापक-नेतृत्वाखालील उद्योजकतेचे हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.