पाटणा,
Muslims nominated in JDU's second list बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४४ उमेदवारांचा समावेश असून, त्यापैकी चार मुस्लिम उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जेडीयूने पहिल्या यादीत ५७ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे दोन्ही याद्यांमधून मिळून पक्षाचे १०१ उमेदवार आता निवडणूक मैदानात उतरले आहेत. या नव्या यादीत विविध सामाजिक गटांना प्रतिनिधित्व देण्यावर भर देण्यात आला आहे. केसरिया मतदारसंघातून शालिनी मिश्रा, शिवहरमधून श्वेता गुप्ता आणि सुरसंदमधून नागेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे. मुस्लिम समाजातून आमोरमधील सबा जफर, जोकीहाटचे मंझर आलम, अररिया येथील सगुफ्ता अझीम आणि चैनपूर येथील जामा खान यांना तिकीट देण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अनुभवी आणि काही नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. जहानाबादमधून चंद्रेश्वर चंद्रवंशी, कारगहरमधून बशिष्ठ सिंग, करकटमधून महाबली सिंग, नवीनगरमधून चेतन आनंद, वाल्मिकीनगरहून धीरेंद्र प्रताप सिंग उर्फ रिंकू सिंग, तसेच सिक्टामधून समृद्ध वर्मा हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवरही पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. त्रिवेणीगंज येथून सोनम राणी सरदार, राणीगंज येथून अचमित ऋषीदेव, धोरय्या येथून मनीष कुमार आणि मनिहारी येथून शंभू सुमन या उमेदवारांना जेडीयूने मैदानात उतरवले आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात की या उमेदवारांच्या माध्यमातून नीतीश कुमार यांनी सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाचे धोरण कायम ठेवले आहे. उत्तर बिहारपासून सीमांचलपर्यंत आणि मग दक्षिण बिहारपर्यंत सर्व भागातील उमेदवारांना समान संधी देण्यात आली आहे. एनडीएच्या जागावाटपानुसार आता जेडीयूचे १०१ उमेदवार अधिकृतरीत्या घोषित झाले असून, पक्षाचे सर्व सैनिक प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. येत्या काही दिवसांत पक्षाच्या प्रचार मोहिमेला वेग येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.