देशात नक्षलवाद शेवटची घटक मोजत आहे- शहा

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Naxalism will end soon in country छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे अबुझमद आणि उत्तर बस्तर नक्षलमुक्त झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अमित शहांनी दिली. त्यांनी सांगितले की, बुधवारी महाराष्ट्रात ६१ तर छत्तीसगडमध्ये २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. गेल्या दोन दिवसांत एकूण २५८ लढाऊ प्रशिक्षित डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद शेवटचा श्वास घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 

Murradabad Diwali  
 
अमित शाह यांनी एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत आजचा दिवस ऐतिहासिक आहे. छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, काल २७ जणांनी शस्त्रे टाकली. महाराष्ट्रात ६१ नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतले. भारतीय संविधानावर विश्वास ठेवून हिंसाचाराचा त्याग करणाऱ्यांचे मी कौतुक करतो. गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की, ज्यांना आत्मसमर्पण करायचे आहे त्यांचे स्वागत आहे, तर जे बंदुका वापरणे सुरू ठेवतील त्यांना सुरक्षा दलाच्या रोषाचा सामना करावा लागेल. अजूनही नक्षलवादाच्या मार्गावर असलेल्या कार्यकर्त्यांना शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद उध्वस्त करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
छत्तीसगडमधील अबुझमद आणि उत्तर बस्तर एकेकाळी नक्षलवाद्यांचे गड असले, परंतु आता ते नक्षलवादी दहशतवादमुक्त घोषित झाले आहेत. दक्षिण बस्तरमध्ये देखील लवकरच सुरक्षा दल नक्षलवादाचा पूर्ण नाश करतील, असे अमित शहा यांनी सांगितले. त्यांनी २०२४ जानेवारीपासून भाजपा सरकारच्या कार्यकाळात २,१०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, १,७८५ जणांना अटक करण्यात आली आणि ४७७ जणांचा खात्मा करण्यात आला असल्याचे आकडेवारीत नमूद केले. गृह मंत्रालयानुसार, नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या आता तीनवर आली आहे. फक्त विजापूर, सुकमा आणि नारायणपूर हे जिल्हे उर्वरित आहेत. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाने ग्रस्त जिल्ह्यांची संख्या १८ वरून फक्त ११ वर आली आहे. या जिल्ह्यांमध्ये छत्तीसगडमधील विजापूर, दंतेवाडा, गरियाबंद, कांकेर, मोहला-मानपूर-अंबागड चौकी, नारायणपूर आणि सुकमा तसेच झारखंडमधील पश्चिम सिंहभूम, मध्य प्रदेशातील बालाघाट, महाराष्ट्रातील गडचिरोली आणि ओडिशातील कंधमाल यांचा समावेश आहे.
 
 
वेगवेगळ्या कारवाईत ३१२ डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, ज्यात सीपीआय (माओवादी) सरचिटणीस आणि आठ पॉलिटब्युरो/केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, ८३६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि १,६३९ जणांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील झाले. यामुळे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची एकूण संख्या आता १,८०९ वर पोहोचली आहे.