दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे?

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
PM Kisan Yojana केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये मिळतात. योजनेत आतापर्यंत २० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत, आणि आता २१वा हप्ता कधी येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जमा झाला होता. सध्या २१वा हप्ता काही राज्यांमध्ये आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. विशेषतः पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला आहे, तर इतर राज्यांतील शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीपूर्वी हप्त्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे, मात्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हा हप्ता नोव्हेंबरपर्यंत लांबू शकतो.
 

PM Kisan Yojana 
 
पीएम किसान योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या कुटुंबात एका व्यक्तीला २ हेक्टरपर्यंतची जमीन आहे आणि ज्यांचा नाव संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत नोंदणीकृत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. केवायसी झाल्यानंतरच हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ वर माहिती उपलब्ध आहे. सध्या अंदाज आहे की, दिवाळीपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात २१वा हप्ता जमा होईल, तर काहींना पडताळणी पूर्ण होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.