बुलढाणा,
Poonam Bangale : स्थानिक मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथील विद्यार्थिनी पूनम बंगाळे हिने क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा आणि शहराचा गौरव वाढवला आहे. नुकत्याच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आयोजित अंतर-विद्यापीठ अॅथलेटिस स्पर्धेत तिने १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही धावण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम स्थान पटकावत दोन सुवर्णपदके मिळवली आहेत.
पूनम बंगाळे ही बी.एस.सी. भाग एक या वर्गात शिक्षण घेत आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत तिने १०० मी व २०० मीटरची शर्यत पूर्ण करून आपला वेग आणि कौशल्य सिद्ध केले. या स्पर्धेत कितीतरी स्पर्धकांनी आणि विद्यापीठांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या दुहेरी विजयामुळे मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाण्याचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरावर चमकले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ.अण्णासाहेब म्हळसणे यांनी कु.पूनम बंगाळे हिचे विशेष अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्रमुख प्रा.सुनिता गायकी डॉ.महेश व्यवहारे तसेच क्रीडा समिती सदस्य प्रा.किशोर बुलकडे प्रा.तुषार पारवे यांनी कु.पूनम बंगाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बरेच प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.