मुंबई
Sharad Pawar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे राजकीय धक्के बसले आहेत. बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगर जिल्ह्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. या तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या फुटीनंतरही शरद पवार यांच्यासोबत निष्ठा राखली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला त्यांचा अचानक निर्णय पक्षासाठी धक्कादायक ठरला आहे.
हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या तिघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, कौटुंबिक कारणांची नोंद करत त्यांनी पक्षातील जबाबदारी सोडली आहे. या राजीनाम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघातील माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार गटाची साथ देत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाभरात पक्ष संघटना उभारणीसाठी प्रयत्न केले. मात्र, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या राजीनाम्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात खेडेकर यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे दिला असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, Sharad Pawar तीनही जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले नसले, तरी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते शरद पवार गटातच राहणार की विरोधी गटात सामील होणार, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला हे तीन मोठे धक्के बसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढे जिल्हास्तरीय नेतृत्वाची नव्याने उभारणी करणे ही मोठी कसरत ठरणार आहे. पक्षाच्या निष्ठावान आणि अनुभवी नेत्यांनीच पद सोडल्यानंतर उर्वरित कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या राजीनाम्यांचे दूरगामी परिणाम निवडणूक निकालांवर देखील होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.