इस्लामाबाद,
Taliban is fighting us for India पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानामुळे या वादाला नव्या वळण मिळाले आहे. त्यांनी आरोप केला की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकार आता पाकिस्तानविरोधात भारताचे छुपे युद्ध लढत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आसिफ म्हणाले, तालिबानवर आता विश्वास ठेवणे अवघड झाले आहे. त्यांच्या अलीकडील निर्णयांमधून हे स्पष्ट होते की ते पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध काम करत आहेत. त्यांच्या हालचालींमागे नवी दिल्लीचा हात असल्याचे दिसते. त्यामुळे दोन्ही देशांमधील युद्धबंदी जास्त काळ टिकणार नाही.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या मते, अफगाण भूमीवरून पाकिस्तानवर दहशतवादी हल्ल्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी सुरक्षा चौक्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि तालिबान सरकारने या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप केला. आसिफ म्हणाले, आम्ही अनेकदा राजनैतिक माध्यमांद्वारे अफगाणिस्तानशी चर्चा केली आहे, पण तालिबान आमच्या चिंता गांभीर्याने घेत नाही. मला भीती आहे की युद्धबंदी टिकणार नाही, कारण सध्या तालिबानचे निर्णय दिल्लीच्या इशाऱ्यावर घेतले जात आहेत. मुत्ताकी साहिब नुकतेच भारतातून परतले आहेत, आणि आता तेथून कोणत्या योजना आणल्या हे विचारण्याची वेळ आली आहे. काबुल सध्या भारतासाठी प्रॉक्सी युद्ध लढत आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध ढासळले आहेत. पाकिस्तानने वारंवार सीमापार दहशतवाद रोखण्याची मागणी केली असली, तरी टीटीपीसारख्या संघटनांच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याने इस्लामाबादमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे दक्षिण आशियातील सुरक्षा असंतुलन वाढेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतावर पाकिस्तानने केलेले आरोप नवे नाहीत. इस्लामाबादने अनेक वेळा भारतावर अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढवण्याचा आणि पाकिस्तानविरोधी गटांना समर्थन देण्याचा आरोप केला आहे. मात्र, भारताने हे सर्व दावे ठामपणे नाकारले आहेत. प्रॉक्सी वॉर म्हणजे असे युद्ध जे थेट एखाद्या देशाने न लढता, दुसऱ्या गटामार्फत किंवा देशामार्फत लढले जाते आणि त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होतो. सध्या पाकिस्तान याच संदर्भात भारतावर आरोप करत आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात नुकतीच जाहीर झालेली युद्धबंदी आता स्वतः पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या विधानामुळेच धोक्यात आली आहे. त्यांच्या वक्तव्याने या प्रदेशातील राजनैतिक तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.