चार एकरातील तूर पिकावर शेतकर्‍याने फिरवला ट्रॅटर

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
washim-farmer : शेतकर्‍याच्या डोळ्यांदेखत त्याचा घास हिरावला गेला. बातमीतील ही ओळ अतिशयोक्ती नाही, तर यंदाच्या खरीप हंगामात कामरगाव परिसरातील वास्तवाचे जिवंत चित्र आहे. गेल्या दोन महिन्यातील मुसळधार आणि अतिरेकी पावसाने शेतकर्‍यांची संपूर्ण गणिते मोडीत काढली. तूर, सोयाबीन, कपाशी यांसारख्या मुख्य पिकांचे नुकसान इतके गंभीर झाले आहे की, अनेक शेतकर्‍यांच्या अंगावरील मेहनतीचे वस्त्रही नष्ट झाले आहे.
 
 
washim
 
कामरगाव येथील युवा शेतकरी यश गायकवाड यांनी गट क्रमांक २२ मधील चार एकर शेतात सोयाबीन आणि तूर पिकाची लागवड केली होती. पावसाने आणि रोगराईने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाले, चार एकरमध्ये फक्त सात क्विंटल सोयाबीन मिळाले. तुरीच्या पिकाकडून तरी काही दिलासा मिळेल, अशी आशा होती पण तीही फोल ठरली. तुरीचे झाडे उभे होते, पण पावसाच्या तडाख्याने पाने गळून गेली, फुले झडली, शेंगा तयार होण्याआधीच किडीचा प्रकोप वाढला. शेवटी यश गायकवाड यांनी चार महिन्यांचे उभे पीक ट्रॅटरने नांगरून टाकले आणि शेत जनावरांसाठी खुले केले.
 
 
त्या क्षणी शेतकर्‍याच्या डोळ्यांत अश्रू तर होतेच, पण त्याचबरोबर असहायतेचा दाहही होता. खरीप पेरणीला चार महिने उलटले असून सोयाबीन काढणीला आले आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळाले नाही. काही शेतकर्‍यांना एकरी केवळ दोन क्विंटल इतकेच सोयाबीन पदरी पडले. एवढ्या कमी उत्पादनाने बियाण्याचा, औषधांचा, खतांचा आणि मजुरीचा खर्चही निघत नाही. यात भर म्हणून बाजारात सोयाबीनचे भाव कोसळले. व्यापारी २० टक्के आर्द्रता असल्याचे कारण सांगत, शेतकर्‍यांकडून ३ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत. काढणीच्या मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकर्‍यांना विवश होऊन मिळेल त्या दरात पीक विकावे लागत आहे.
 
 
चार महिने दिवस-रात्र कष्ट करून जे पीक उभं केलं, ते अखेर जनावरांच्या पोटासाठी टाकावं लागतं यापेक्षा मोठा अन्याय कोणता? असा प्रश्न स्थानिक शेतकरी उपस्थित करीत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. बँकांचे थकबाकी हिशेब वाढले आहेत, तर भाववाढीच्या अपेक्षेने पिके साठवून ठेवण्याची शक्ती शेतकर्‍याकडे उरलेली नाही. शासनाकडे त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची, तसेच सोयाबीन खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
 
 
अपेक्षीत उत्पन्न अभावी आपल्या चार एकर क्षेत्रातील तूर पिकावर ट्रॅटर फिरवून शेत जनावरांसाठी खुले केले. अशातच त्याच चार एकरात त्यांना केवळ सात क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळाले. ज्यातून २० ते २१ हजार रुपये हाती आले. तेही सर्व पैसे सोंगणीत आणि काढणीत गेले. त्यामुळे संसाराचा गाढा पुढे कसा ओढावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यश गायकवाड, शेतकरी कामरगाव