माजी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समस्यांचा निपटारा करणार: अनुज तारे

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
वाशीम, 
anuj-tare : माजी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या योग्य त्या मागण्या तसेच समस्यांचा निपटारा करण्यासाठी आपण कटीबध्द राहु, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
 
tare
 
 
 
यावेळी पुढे बोलतांना पोलिस अधिक्षक अनुज तारे म्हणाले की, पोलिस सेवेमध्ये असतांना पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सेवा दिली. या काळात त्यांना आपले कूटुंबीय तसेच आरोग्याकडे देखील लक्ष देता आले नाही. ही वस्तुस्थिती आहे. सेवानिवृत्तीनंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना अत्यंत चांगले जीवन जगता यावे यासाठी पोलिस विभागाकडे सेवानिवृत कर्मचार्‍यांची जी काही कामे असतील ती निश्चितच कायदेशीर मार्गाने त्वरीत करण्यात येतील. पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यासाठी पोलिस घटकांच्या मालकीच्या खुल्या जागेवर सबंधीतासाठी दोन खोल्याचे कार्यालय बांधण्याबाबत तसेच कल्याणकारी योजना राबविण्या करीता डिजी यांनी दिलेल्या लेखी परीपत्रका प्रमाणे योग्य ती कारवाई केल्या जाईल. मात्र यासाठी निधी उपलब्ध करण्यास सेवा निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे, असे देखील त्यांनी सांगितले.
 
 
जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचा वाशीम जिल्हा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रल्हाद काटकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव अंभोरे, सेवानिवृत्त उप विभागीय अधिकारी पंडीत सरनाईक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यतची वाटचाल सर्वाच्या समक्ष मांडली. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना योग्य तो न्याय आपण जिल्हाध्यक्ष या नात्याने नक्की देवू असा विश्वास त्यांनी या प्रसंगी बोलतांना व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडीत सरनाईक यांनी तर संचालन व आभार सुरेश गाठेकर यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.