कारंजा लाड,
Karanja Market Committee : दिवाळीपूर्वी आणि आगामी रब्बी हंगामाच्या तयारीत शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीकडे मोठ्या प्रमाणावर वळताच, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ ऑटोबर रोजी सोयाबीनची तब्बल ७ हजार क्विंटलची आवक नोंदवली गेली. दरांमध्येही चांगले सुधार दिसून आले असून, गुरुवारी कमीतकमी दर ३६१० रुपये, सरासरी दर ४२५० रुपये आणि कमाल दर ४४५९ रुपये प्रति क्विंटल असा राहिला. काहीशा दरवाढीमुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.

गेल्या काही आठवड्यापासून दरात झालेल्या चढ -उतारानंतर सोयाबीनच्या किमतींना स्थैर्य आणि वाढ दोन्ही लाभले आहेत. दिवाळी जवळ आल्याने घरगुती खर्च भागविण्यासाठी तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे, खत आणि इतर शेतीसामग्री खरेदीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. अनेक शेतकर्यांनी मागील काही आठवड्यापासून साठवलेला माल आता बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. दर वाढीमुळे व्यापारी आणि खरेदीदार यांच्यात स्पर्धात्मक बोली लावण्याचे वातावरण निर्माण झाले.त्यामुळे बाजार समिती परिसरात सकाळपासूनच वर्दळ असून, व्यापारी मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.
बाजार समिती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दरामध्ये स्थिरता राहण्याची शयता असून, गुणवत्तापूर्ण सोयाबीनला ४४०० रुपयांहून अधिक दर मिळत आहेत. काही दिवसाच्या तुलनेत या वर्षी दरात काही प्रमाणात सुधार दिसत आहे. दिवाळीपूर्वी पैसे हातात येत असल्याने सुगीचा माहोल निर्माण झाला आहे. कारंजा बाजार समितीत सध्या कृषी व्यवहारांना चांगला वेग आला असून, दर वाढीमुळे शेतकर्यांचा आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे.