नियतीचा ‘जुगाड’

jaisalmer-bus-fire-jugaad पण, नियतीचा ‘जुगाड’ वेगळाच असतो

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
वेध
: रेवती जोशी-अंधारे
 
 
jaisalmer-bus-fire-jugaad ‘जुगाड’ हा शब्द समस्त भारतीयांना मोठा प्रिय आहे. दैनंदिन व्यवहारांपासून ते कार्यालयीन कामकाजापर्यंत प्रत्येक बाबतीत ‘जुगाड’ करण्यात आपण अव्वल आहोत. विशेषत: गाड्या घेताना, वाहतुकीचे नियम पाळताना अगदी साधं हेल्मेट घालण्यातही जुगाड शोधणारी आपली जमात! चांगल्या दणकट हेल्मेटऐवजी फायबरची टोपली हेल्मेट म्हणून घालताना, आपलाच जीव धोक्यात असतो. राजस्थानच्या जैसलमेरमधून एसी बसच्या थंडाव्यात निघालेल्या प्रवाशांच्या बाबतीतही असेच झाले. फक्त इतरांनी फायद्यासाठी केलेला ‘जुगाड’ त्यांची चिता रचणारा ठरला.
 
 
 

Jaisalmer-bus-fire-jugaad 
 
 
 
jaisalmer-bus-fire-jugaad एकूण 57 प्रवाशांना घेऊन जोधपूरकडे निघालेली ही बस अलिकडेच सामान्य बसमधून एसी बसमध्ये रूपांतरित झाली होती. हे मॉडिफिकेशन ‘जुगाड’ प्रकारात मोडणारे असल्यामुळे एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. धूर आणि उष्णतेमुळे बसमधून बाहेर पडण्याची दारं आतून लॉक झाली आणि नंतरचा भीषण परिणाम आपण जाणतोच. बसला मॉडीफाय करून रस्त्यावर आणण्यासाठी काही नियम आहेत, कागदोपत्री कारवाई करावी लागते. नियमांनुसार स्लीपर बस टाईप-4 वर्गवारीत येते. आधी बसच्या चेसिसची खरेदी करून, त्यानुसार बसची बॉडी बनवावी लागते. त्यात बसमध्ये लागणाऱ्या सीट्स, त्यांची संख्या, डिझाईन आणि आकार महत्त्वाचा आहे.
 
 
 
 
 
jaisalmer-bus-fire-jugaad इतकी प्रक्रिया झाली की, तीन तपास संस्थांकडून बसची पाहणी होते आणि बसच्या प्रकाराला मान्यता मिळते. मग बसला फिटनेसचे प्रमाणपत्र मिळते. ही प्रक्रिया बसची बॉडी बनविणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीला करावी लागते. पुन्हा एकदा बसची अंतिम तपासणी होऊन, बस रस्त्यावर आणण्यास मंजुरी मिळते. कायदे आणि नियमांनुसार सगळं झालं तर काहीच अडचण नाही, पण ही सगळी प्रक्रिया किचकट, वेळखाऊ आणि तुलनेने महाग आहे. मग मदतीला धावून येतो ‘जुगाड’! प्रस्थापित आणि मोठे बस बॉडी मेकर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करतात. या व्यवसायात अननुभवी, गुंतवणूक करू न शकणाऱ्या, तांत्रिक बाबींचे ज्ञान नसलेल्या बॉडी मेकिंग मेकॅनिककडून बस बनवून घेतात. त्यातही कागदोपत्री वेगळा साईज, डिझाईन, संख्या आणि प्रत्यक्षात बनते वेगळेच!
 
 
 
 
 
jaisalmer-bus-fire-jugaad म्हणजे मंजूर डिझाईन 13 आसन क्षमतेचे आणि बसमध्ये असतात 15, एक्सएल चेसिसवर डबल एक्सएल आकाराची बस बनवतात. बसमध्ये एसी लावताना फायर एक्झिटची व्यवस्था असायलाच हवी; पण जुगाड नियमांपेक्षा मोठा ठरतो. एका साध्या बसला मॉडीफाय करण्यासाठी एसीसह 25 लाखांपर्यंत खर्च येतो. यात चेसिस आणि टायरचा खर्च धरला जात नाही. कमी पैशांत ‘लक्झरीयस’ बस बनविताना सर्वात आधी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. खालच्या दर्जाचे साहित्य आणि खराब वायरिंग म्हणजे ‘उपर से टामटूम, अंदर की राम जाने!’ या जुगाडातून हकनाक बळी तेवढे जातात. ईशान्येकडील राज्यांमध्ये विशेषत: नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशांत अशा बसेस ‘बनवून’ मिळतात. शिवाय, टॅक्स कमी लागतो.
 
 
 
 
jaisalmer-bus-fire-jugaad उदाहरणार्थ एखाद्याने राजस्थानात रजिस्ट्रेशन केले तर त्याला महिन्याला जवळपास 48 हजार म्हणजे वर्षाचे जवळपास 6 लाख करापोटी द्यावे लागतात. ईशान्य राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन केल्यास ही रक्कम थेट 10 टक्क्यांनी कमी होते. एकदा नॅशनल परमिट मिळाले की, देशभरात कुठेही बस चालवता येते. आपल्या बुलढाण्याहून पुण्याकडे निघालेल्या बसचा कोळसा झाला आणि तीन चिमुकल्यांसह 25 जण जिवंत जळाले. इतके की, मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची वेळ आली होती. बाकी देशभरात नियमितपणे अशी जळीतकांडं घडतात. चर्चा होऊन नवे नियम अंमलात येतात आणि सोबतच नवे जुगाडही! पण, नियतीचा ‘जुगाड’ वेगळाच असतो आणि तो आपल्या समजण्यापलीकडे असतो, हे मात्र नक्की!
 
 
9850339240