अमरावती,
sant-achyut-maharaj-heart-hospital शासनाच्या आरोग्य विभागातर्फे उत्तम कार्यासाठी देण्यात येणार्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने अमरावती येथील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला गौरविण्यात आले आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार दत्तात्रय भरणे, पद्मश्री पोपटराव पवार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याहस्ते श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, सचिव सागर पासेबंद, विश्वस्त मनोज वाडेकर तसेच गुणवंत डहाणे, राजेंद्र दिगंबर, धनंजय मेटे, दत्ता खंदारे यांनी हा पुरस्कार स्विकारला. sant-achyut-maharaj-heart-hospital कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरोग्य विभागातील अधिकारी व पुरस्कार प्राप्त अन्य संस्थेचे पदाधिकारी आणि व्यक्ती हजर होते. नागरिकांची देखील उपस्थिती होती. हा सन्मान संस्थेचे सर्व कार्यकर्ते, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक ठरला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत राबविण्यात येत असलेल्या एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये श्री संत अच्युत महाराज हॉर्ट हॉस्पिटल अंगीकृत आहे. सदर योजनेतून लाभार्थ्यांवर सन २०२४-२०२५ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया/उपचार विचारात घेऊन खाजगी अंगीकृत रुग्णालये या वर्गवारीत हार्ट हॉस्पिटलची निवड उपरोक्त पुरस्कारासाठी करण्यात आली होती. हॉस्पिटलला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संत अच्युत महाराज परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.