ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

राजकारणात मोठी शोकस्मरणीय हाणी

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
राहुरी,
Shivajirao Kardile  महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे निधन कळताच राहुरी आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारणात एक मोठी शोकस्मरणीय हाणी झाली आहे, कारण कर्डिले हे आपल्या सामाजिक बांधिलकीने आणि तळागाळातील लोकांच्या हितासाठी ओळखले जात होते.
 

Shivajirao Kardile  
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले आहे की, “आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व हरपले. त्यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला आणि सहकार चळवळीसाठी अनेक महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे एक बहुमूल्य नेतृत्व गमावले आहे."
 
 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कर्डिले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांवर काम केले आणि हे काम नेहमीच आदर्श ठरले. त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात दिलासा मिळो, हीच प्रार्थना.”विधिमंडळातील माजी सहकारी आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही कर्डिले यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले की, "शिवाजीराव कर्डिले हे माझे जवळचे सहकारी होते. त्यांचा आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कर्तृत्व आणि समाजकार्य अजूनही अनेकांना प्रेरणा देईल. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो."
 
 
 
 
 
त्यांनी आपली राजकीय कारकीर्द बुऱ्हाणनगरच्या सरपंच पदापासून सुरू केली होती. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी आपल्याला भाजपचे मजबूत नेतृत्व दिले. नगर जिल्ह्यात त्यांच्या कार्याचा ठसा राहिला. राजकारणातील सुरुवातीच्या काळातच त्यांनी तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी मोठे प्रयत्न केले. शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास त्यांचे कष्ट आणि समर्पण यांचे द्योतक होता.त्यांनी 1984 मध्ये बुऱ्हाणनगरच्या सरपंच पदावर काम करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये बानेश्वर शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. 1995 मध्ये त्यांनी नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आमदारकी गाठली. त्यानंतर 2004 मध्ये राज्य मंत्रिमंडळात मत्स्य व बंदरे विकास खात्याचा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना नगर दक्षिण खासदार पदाचा देखील अनुभव आला. भाजपकडून 2014 मध्ये राहुरी-नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2023 मध्ये ते ADCC चे चेअरमन म्हणून देखील कार्यरत होते.कर्डिले यांच्या निधनामुळे त्यांचे सहकारी, कार्यकर्ते आणि जनतेमध्ये एक मोठा शोक पसरला आहे. त्यांचे कार्य आणि समाजकार्य हे त्यांच्याबद्दलचा आदर कायम ठेवतील. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.