सिंधी कॅम्पमध्ये सौर पॅनलने घेतला पेट

सुदैवाने अनर्थ टळला,सौर पॅनेलचे नुकसान

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Solar panel catches fire : शहरातील सिंधी कॅम्प परिसरात शुक्रवार, १७ ऑटोबर रोजी सकाळी ११.३० वाजता च्या सुमारास घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. जगमलानी यांच्या इमारतीच्या छतावरील सौर पॅनल प्रणालीला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट दिसून आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सौर पॅनेलचे मोठे नुकसान झाले आहे.
 

J 
 
 
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनलमधून अचानक ठिणग्या पडू लागल्या आणि काही क्षणातच पेट घेऊन धूर पसरला. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ सावधगिरी बाळगून कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे इमारतीचा मोठा भाग वाचला आणि संभाव्य अनर्थ टळला.
 
 
जर आग आणखी काही मिनिटांनी विझवली असती, तर ती संपूर्ण छतावरील विद्युत यंत्रणेत पसरून मोठे नुकसान झाले असते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. आगीमुळे सौर पॅनलचे वायरिंग आणि काही उपकरणे जळून खाक झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किट हे आग लागण्याचे संभाव्य कारण असू शकते.या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी, इमारतीवरील सौर यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.