शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात?

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
farmers-diwali : राज्य शासनाने अतिवृष्टग्रस्त शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या जंबो पॅकेजकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. दिवाळीपूर्वीच मदतीची रकम खात्यात जमा होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होता. परंतु, दिवाळी दोन दिवसांवर असल्याने मदत मिळणे धुसर आहे. शेतकर्‍यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
 
 
 
wardha
 
 
 
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक भूईसपाट झाले आहे. यामुळे दिवाळी सणाला हाती पैका नाही. शासकीय मदतीवर घरचा सण अवलंबून असल्याने शेतकर्‍यांचे लक्ष त्याकडे होते. परंतु, आता ही मदत दिवाळीनंतरच मिळेल, असे दिसून येत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापूस व सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांनी अजून कापूस वेचणी झाली नाही. तर सोयाबीनचे पीक शेंगातच कुजले. परिणामी, शेतकर्‍यांच्या हाती काहीच उत्पन्न आले नाही. उत्पन्नापेक्षा पीक काढण्यासाठीचा खर्च अधिक पडतो, असे शेतकरी सांगत आहेत. काहींनी तरी दिवाळीच्या आशेने पीक काढण्याचा प्रयत्न सुरू केला असला. तरी बाजारात काढणी झालेल्या सोयाबीनला हमी भावापेक्षा जवळपास केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.
 
 
शासनाने नुकतचे नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरडवाहू शेतीसाठी हेटरी, १८ हजार ५०० रुपये तर बागायती शेतीसाठी २७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरविण्यात आले. तसेच पीकविमा घेतलेल्या शेतकर्‍यांना अतिरित भरपाईही देण्यात येणार आहे. परंतु, ही मदत अजून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली नाही. शेतकरी दररोज बँकेत जाऊन चौकशी करत आहेत.