प्रवाशांचा थरकाप...धु-धु जळू लागले गरीब रथचे डब्बे!

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
लुधियाना,
Garib Rath Express catches fire लुधियानाहून दिल्लीला जात असलेल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी सकाळी मोठा अपघात टळला. पंजाबमधील सरहिंद स्थानकाजवळ या गाडीच्या एका बोगीत अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, लोको पायलटच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा ट्रेनने सरहिंद स्टेशन पार केले होते. गाडीच्या १९ क्रमांकाच्या एसी बोगीतून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बोगीला भीषण आग लागली. सुरुवातीच्या तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
Garib Rath Express catches fire
आगीची तीव्रता वाढताच लोको पायलटने तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरविण्याचे निर्देश दिले. प्रवाशांनी आपले सामान सोडून जीव वाचवण्यासाठी घाईघाईत बोगीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली. या दरम्यान स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. उत्तर रेल्वे अंबाला विभागाचे डीआरएम यांनी सांगितले की, अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेस (गाडी क्र. १२२०४) मध्ये सरहिंद जंक्शनवर आग लागल्याची माहिती मिळाली होती.
 
 
 
 
रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक यंत्रणा त्वरित घटनास्थळी पोहोचली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे समजते, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेनंतर प्रवाशांनी लोको पायलट आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे एका मोठ्या दुर्घटनेचा संभव टळल्याचे साक्षीदारांनी सांगितले. या भीषण प्रसंगानंतर रेल्वे प्रशासनाने संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून, गाड्यांच्या एसी बोग्यांमधील इलेक्ट्रिकल तपासणी आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.