पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; पतीला 10 वर्षाचा सश्रम कारावास

- जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
गोंदिया,
attempted-murder-of-wife : पत्नीच्या कपाळावर कुर्‍हाडीने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या पतीला जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पवन सुरज खांडेकर (42) रा. गोरेगाव असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायधीश क्र. 1 ए. एस. प्रतिनिधी यांनी शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा निकाल दिला.
 
 
gondia
 
 
 
सविस्तर असे की, आरोपी पवन हा दारू पिण्याच्या सवयीचा असतानाच पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होत असे, त्यामुळे त्याची पत्नी रुपाली (बदललेले नाव) व तो वेगवेगळे राहत होते. घटनेच्या दिवशी 17 मार्च 2022 रोजी आरोपी पवनच्या वडीलांची प्रकृती बरी नसल्याने तो पत्नीसोबत घरी आला होता. दरम्यान, आरोपीने पुन्हा पत्नी रुपालीशी तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यातच रात्री घरातील सर्व लोक जेवण करून झोपल्याचे पाहून आरोपीने रात्री 1 वाजताच्या सुमारास रुपाली झोपली असताना तिच्या कपाळावर कुर्‍हाडीने वार करून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुपालीने आरडाओरड केल्याने कुटूंबीयांना जाग आली. दरम्यान, रुपालीच्या मुलीने तिला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविले.
 
 
वेळेवर उपचार झाल्याने रुपालीचा जीव वाचला. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलगी ईशा पवन खांडेकर हिच्या तक्रारीवरून आरोपी पवनच्या विरोधात कलम 326 भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. याप्रकरणी तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोसावी यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान, पिडीत व सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश चांदवानी व सहाय्यक सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी 10 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवून वैद्यकीय तसेच इतर कागदपत्र न्यायालयात सादर केली. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या युक्तीवादानंतर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायधीश ए. एस. प्रतिनीधी यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी पवन सुरज खांडेकर याला भादंवीचे कलम 307 अंतर्गत 10 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिन्याचा अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठवली. या प्रकरणात पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी सहाय्यक फौजदार प्रकाश शिरसे यांनी काम पाहिले.