दिवाळीत मुसळधार पावसाचे सावट...हवामान विभागाचा इशारा

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Heavy rains expected during Diwali मान्सून परतला असला तरीही यंदा दिवाळीत महाराष्ट्रात पावसाचा धोका कायम आहे. राज्यातील उर्वरित भागात ऑक्टोबरच्या उन्हाचे चटके जाणवतात, मात्र दक्षिणेकडे तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे काही ठिकाणी पावसाचे संकेत आहेत. हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 

Heavy rains expected during Diwali 
 
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे आहेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सात दिवस मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर थेट धोका नाही, पण हवामान अचानक बदलू शकते. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १९ ऑक्टोबर रोजीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस राहणार असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पावसातच साजरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता नसून, कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस राहणार आहे. दमट हवेमुळे उकाडा जाणवेल. ठाणे व नवी मुंबई परिसरातही हवामान कोरडे राहील. पालघर जिल्ह्यात आकाश ढगाळ राहू शकते, तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस येण्याचा धोका नाही.