इस्लामाबाद,
India's conspiracy from Afghanistan पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी तालिबान सरकारला थेट धमकी दिली आहे. अफगाणिस्तानातील ताज्या बॉम्बस्फोटानंतर मुनीर यांनी भारतावरही गंभीर आरोप करत म्हटले की, भारत समर्थित दहशतवादी गटांना अफगाण भूमीवर आश्रय मिळत आहे आणि तेथून पाकिस्तानवर हल्ले केले जात आहेत.
अबोटाबाद येथील लष्करी अकादमीतील कार्यक्रमात बोलताना मुनीर यांनी अफगाणिस्तान सरकारवर कठोर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, तालिबान राजवटीने आपल्या भूमीवरून पाकिस्तानात हल्ले करणाऱ्या गटांवर तातडीने कारवाई करावी. जर अफगाणिस्तानातून पाकिस्तानावर हल्ले सुरूच राहिले, तर आम्हीही प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुनीर यांनी पुढे म्हटले की, भारताकडून पाठिंबा मिळणारे गट अफगाणिस्तानाच्या सीमारेषेवर सक्रीय आहेत आणि हेच दोन्ही देशांतील तणावाचे प्रमुख कारण आहे. त्यांनी भारतावर अफगाणिस्तानात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत म्हटले की, भारत पुरस्कृत दहशतवाद हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका ठरत आहे.
अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर या वक्तव्याने परिस्थिती आणखी तापली आहे. पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी पक्तिका प्रांतातील अनेक भागांवर हवाई हल्ले केले होते. अफगाण मीडियानुसार, या हल्ल्यांमध्ये महिलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात काही स्थानिक क्रिकेटपटूंचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी तालिबान प्रशासनाच्या वर्तुळात पाकिस्तानविरोधी रोष निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे दक्षिण आशियातील राजनैतिक समीकरणे आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुनीर यांनी आपल्या भाषणात मे महिन्यातील भारताशी झालेल्या सीमासंघर्षाचाही उल्लेख केला आणि दावा केला की, “त्या वेळी पाकिस्तानी सैन्याने भारताला ठोस प्रत्युत्तर दिले होते. आता अफगाण भूमीवरून येणाऱ्या प्रत्येक हल्ल्यालाही तशीच प्रतिक्रिया दिली जाईल. सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांमधील तणाव वाढत चालला आहे. एका बाजूला तालिबानवर कारवाईचा दबाव वाढतोय, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने भारताकडे पुन्हा बोट दाखवले आहे. या सगळ्याचा परिणाम दक्षिण आशियातील स्थैर्यावर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.