देशाची माओवादी मुक्ततेकडे वाटचाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली
narendra modi गेल्या पाच दशकांहून अधिक काळ माओवादाच्या हिंसक कारवायांनी देशात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. अनेक सुरक्षा रक्षकांना आपले प्राण गमवावे लागले नवतरुणांचे आयुष्य उदासवाणे झाले. मात्र आता परिस्थितीत लक्षणीय बदल घडून आला असून, भारत माओवादमुक्त होण्याच्या दिशेने निश्चित वाटचाल करत आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
 

narendra modi on maoism, 
एनडीटीव्ही वर्ल्ड narendra modi समिटमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, “नक्षलवादी भागांमध्ये गेल्या ५०-५५ वर्षांत शाळा, रुग्णालये उभी राहू दिली गेली नाहीत. विकासाच्या प्रत्येक प्रयत्नाला विरोध करत त्यांनी बॉम्बस्फोट, तोडफोड, हिंसाचार घडवून आणला. त्यामुळे या भागांतील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. ज्यांनी कधी दिवाळीचा दिवा पाहिला नव्हता, ते आता आनंदाने दिवे लावत आहेत.”पंतप्रधानांनी नमूद केले की, एकेकाळी देशातील १२५ हून अधिक जिल्हे नक्षलवादाच्या विळख्यात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत सरकारच्या कठोर धोरणांमुळे ही संख्या घटून केवळ ११ वर आली आहे. त्यातीलही फक्त तीन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी कारवाया सुरू आहेत. "फक्त ७५ तासांत ३०३ माओवादी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. ही सामान्य माणसे नव्हती, हे अत्यंत जहाल माओवादी होते, ज्यांच्या डोक्यावर लाखोंच्या, कोट्यवधींच्या इनामाची घोषणा होती," असे पंतप्रधानांनी सांगितले.
त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना आरोप केला की, त्यांच्या सत्ताकाळात अर्बन नक्षलवाद फोफावला. “त्यावेळी नक्षलवाद्यांच्या क्रूर कृत्यांची माहिती देशासमोर येऊ दिली जात नव्हती. मोठ्या प्रमाणावर सेन्सॉरशिप राबवली जात होती. याला काँग्रेस जबाबदार आहे,” असा गंभीर आरोप मोदींनी केला.
 
 
बस्तरचा उल्लेख narendra modi  करताना मोदी म्हणाले की, एकेकाळी हा भाग नक्षलवाद्यांचा गड मानला जात होता. बॉम्बस्फोट, सुरक्षा दलांवरील हल्ले, खून, अपहरण हेच बातम्यांचे विषय असायचे. पण आता तेच बस्तर ऑलम्पिकच्या बातम्यांनी उजळून निघाले आहे. “आज तिथल्या तरुणांनी ऑलम्पिकचं आयोजन केलं आहे. हजारो तरुण त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ही बदलाची सुरुवात आहे, ही नवभारताच्या उभारणीची नांदी आहे,” असे मोदी म्हणाले.“आज भारत माओवादमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संविधानाच्या नावावर पूर्वी माओवाद्यांचे रक्षण करणाऱ्यांनी प्रत्यक्षात या भागांतील जनतेला अंधारातच ठेवले. आज मात्र या भागात दिवाळीचा प्रकाश पोहोचला आहे,” असेही मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या या विधानामुळे देशातील नक्षलवादाविरोधातील संघर्षाच्या नव्या टप्प्याची नांदी झाल्याचे संकेत मिळाले आहेत. सरकारच्या धोरणांमुळे नक्षलवाद्यांमध्ये आत्मसमर्पणाची लाट सुरू झाली असून, मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बस्तरप्रमाणेच अन्य नक्षलग्रस्त भागांतही विकासाचे वारं वाहत असून, येत्या काळात ही प्रक्रिया अधिक गतीने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.