नक्षलवादी संघटनेचा प्रमुख असल्याचे सांगून पैसे उकळले

२० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश; पत्नींचाही सहभाग उघड

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
झारखंड,
Dinesh Gope, झारखंडमधील पीपुल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI) या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख असलेल्या दिनेश गोपे आणि त्याच्या १९ सहयोगींविरुद्ध प्रवर्तन संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत गंभीर कारवाई करत पूरक अभियोजन आरोपपत्र (Supplementary Prosecution Complaint) दाखल केली आहे. ही चार्जशीट रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
 
 
Dinesh Gope,
 
ED च्या तपासानुसार, PLFI चा प्रमुख दिनेश गोपे आणि त्याच्या टोळीने झारखंडमधील ठेकेदार, व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून धमकी, दहशत आणि हिंसाचाराच्या माध्यमातून सुमारे २० कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली केली. या अवैध रकमेपैकी सुमारे ३.३६ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा मागोवा ED ने आतापर्यंत घेतला आहे.ही कारवाई झारखंड पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांनी दाखल केलेल्या विविध FIR आणि आरोपपत्रांच्या आधारावर सुरू करण्यात आली होती. या प्रकरणांत हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न, जबरदस्तीने वसुली तसेच अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) अ‍ॅक्ट, 1967 (UAPA) अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत.
प्रवर्तन संचालनालयाच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, गोपेच्या दोन्ही पत्नी – शकुंतला कुमारी आणि हीरा देवी – या देखील या आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभागी होत्या. गोपेने वसुलीच्या रकमेचा वापर करून पत्नींच्या नावाने बनावट कंपन्या उभ्या केल्या, ज्या केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात आल्या. या कंपन्यांचा प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय नव्हता.या रकमेचा वापर हवाला नेटवर्क, स्थानिक मनी ट्रान्सफर एजंट्स आणि इतर तृतीय पक्षांच्या कंपन्यांमार्फत अनेकदा फिरवून मूळ स्रोत लपविण्यासाठी करण्यात आला. शेवटी या पैशातून आलिशान गाड्यांची खरेदी, निश्चित मुदत ठेवी आणि कुटुंबाच्या खर्चासाठी वापर करण्यात आला.
 
 
याआधी ED ने PLFI चा एक महत्त्वाचा सदस्य निवेश कुमार याच्याविरुद्धही चार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई केली होती. यामधील दोन कोटी रुपये गोपेकडून शस्त्रे आणि दारुगोळा खरेदीसाठी दिले गेले होते, असे चौकशीतून समोर आले आहे.
 
 
ED ने २० ऑगस्ट २०२५ रोजी दिनेश गोपे याला अटक केली होती. आता नव्या चार्जशीटमध्ये ED ने न्यायालयाकडे सर्व २१ आरोपींविरुद्ध खटला चालवण्याची विनंती केली आहे. तसेच, जप्त केलेल्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.प्रवर्तन संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची तपासणी अद्याप सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. गोपे आणि त्याच्या टोळीने केवळ आर्थिक गैरव्यवहारच नाही, तर प्रदेशात दहशत निर्माण करून शेकडो नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला होता, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.