पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आता ब्रह्मोसच्या आवाक्यात!

राजनाथ सिंह यांचा इशारा

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
लखनऊ,
Rajnath Singh's warning भारताच्या संरक्षण सामर्थ्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ येथे व्यक्त केले. येथील ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटमध्ये तयार झालेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्याच वेळी पाकिस्तानला कडक इशारा दिला की, पाकिस्तानच्या भूमीचा प्रत्येक इंच आता ब्रह्मोसच्या आवाक्यात आहे. ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त एक ट्रेलर होता.
 
Rajnath Singh
 
 
राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात बोलताना सांगितले की, एकेकाळी उत्तर प्रदेश गुंडगिरी, अस्थिर कायदा-सुव्यवस्था आणि भीतीच्या सावटासाठी ओळखला जात होता, पण आज त्याच राज्याने देशातील संरक्षण उत्पादनाचे केंद्रस्थान बनत नवी ओळख निर्माण केली आहे. ते म्हणाले, “गुंतवणूकदार पूर्वी उत्तर प्रदेशात येण्यास घाबरत होते, पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे चित्र पालटले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा दर्जा सुधारला आहे, प्रशासन सक्षम झाले आहे, आणि औद्योगिक विकासाला गती मिळाली आहे.
 
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन हे केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर उत्तर प्रदेश कोणत्याही आव्हानाला समर्थपणे तोंड देऊ शकतो, असा संदेश जगाला देणारा क्षण आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यमंत्री योगी यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाली नसती. त्यांनी या प्रकल्पासाठी नेहमी मनापासून साथ दिली आणि कोणत्याही संसाधनाच्या टंचाईची वेळ येऊ दिली नाही.
 
पाकिस्तानला थेट इशारा देताना संरक्षण मंत्र्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हा फक्त सुरुवात होती. पाकिस्तानचा प्रत्येक भाग आता ब्रह्मोसच्या क्षमतेच्या रेंजमध्ये आहे. भारताचा विजय आता एक अपघाती घटना नाही, तर एक सवय बनला आहे आणि ती सवय आपण अधिक बळकट करू. गेल्या मे महिन्यात लखनौ येथील सरोजिनी नगरमध्ये स्थापन झालेल्या ब्रह्मोस एरोस्पेस केंद्रात सुपरसॉनिक क्षेपणास्त्र विकासाचे काम वेगाने सुरू झाले होते. केवळ पाच महिन्यांच्या आत या युनिटने पहिली तुकडी तयार करून भारताच्या संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक भर घातली आहे.
 
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने स्वदेशी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा अत्यंत अचूक मारा करून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकित केले होते. या घटनेनंतर ब्रह्मोसच्या ताकदीबद्दल संपूर्ण जगात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. ब्रह्मोस एरोस्पेसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही यशस्वी निर्मिती केवळ उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरसाठी एक महत्त्वाचा टप्पा नाही, तर भारताच्या “आत्मनिर्भर भारत” या स्वप्नाला गती देणारा निर्णायक क्षण आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली ही देशात विकसित झालेली सर्वात वेगवान आणि अचूक शस्त्र प्रणाली मानली जाते.
 
लखनौच्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी, आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर परिसरात “जय हिंद, वंदे मातरम”च्या घोषणा घुमल्या. या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीने केवळ भारताच्या संरक्षण क्षेत्रात नव्हे, तर जागतिक पातळीवरही देशाच्या सामर्थ्याचा नवा झेंडा रोवला आहे. आता भारताकडे अशी स्वदेशी ताकद आहे जी शत्रूच्या भूमीपर्यंत काही मिनिटांत पोहोचू शकते आणि हेच राजनाथ सिंह यांच्या इशाऱ्याचे खरे स्वरूप आहे.